scorecardresearch

“नरेंद्र मोदी श्वास घेतायत म्हणून जग चालतंय एवढंच…”, संजय राऊतांचा भाजपाला चिमटा; थेट अल्बर्ट आइनस्टाईनचा केला उल्लेख!

संजय राऊत म्हणतात, “भारतीय जनता पक्षातील ‘अंधभक्तां’चे वेड कोणत्या टोकापर्यंत गेले त्याचे चित्र बुधवारी…!”

sanjay raut on narendra modi amit shah
संजय राऊतांची भाजपावर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

देशात एकीकडे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे संसदेमध्ये राहुल गांधींच्या विधानांवरून गदारोळ होत आहे. त्यामुळे देशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय सुंदोपसुंदी रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. सामनातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरामध्ये संजय राऊतांनी थेट अल्बर्ट आइनस्टाईनचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याना खोचक टोला लगावला आहे.

“देशात भीतीचे वातावरण आहे. माणसाचे शोषण हे भीतीच्या माध्यमातून केले जाते. आज गुडघे टेकण्याची स्पर्धा त्याच भयातून सुरू आहे. भारतीय जनता पक्षात सामील व्हा, गप्प बसा, नाहीतर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांवर अशीच भीतीची तलवार टेकवली व त्यांना शरण आणले हे आता लपून राहिलेले नाही. मोदी-शहांचे राजकीय यश हे त्यांनी निर्माण केलेल्या भीतीत आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“अल्बर्ट आइनस्टाईन मोदी-शाहांच्या खिजगणतीतही नसेल”

“मोदी व शाह सांगतील तीच पूर्व, तोच न्याय, तोच कायदा असे सध्या झाले आहे. कधीकाळी या देशात महान माणसे जन्माला आली याचा विसर पडू लागला आहे. आइनस्टाईनची जयंती नुकतीच साजरी झाली. ‘गांधी नावाचा माणूस या पृथ्वीतलावर आपली पावले कधीकाळी उमटवून गेला हे पुढच्या काळाला खरेदेखील वाटणार नाही,’ असे अल्बर्ट आइनस्टाईन सांगून गेले ते मोदी-शहांच्या खिजगणतीतही नसेल. आइनस्टाईन, गांधींपेक्षा आज अदानीचे साम्राज्य राज्यकर्त्यांना महत्त्वाचे वाटते”, अशा शब्दांत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

“महाराष्ट्र सरकारला कधीपासून चुंबनाचं वावडं झालं?”, संजय राऊतांचा खोचक सवाल; म्हणाले, “यांचा लव्ह जिहाद…!”

“भारतीय जनता पक्षातील ‘अंधभक्तां’चे वेड कोणत्या टोकापर्यंत गेले त्याचे चित्र बुधवारी राज्यसभेत दिसले. ‘नाटू नाटू’ या गाण्यास ऑस्करचा सन्मान प्राप्त झाला. त्यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितले, ‘आता या ऑस्करचे श्रेयही मोदी यांनी घेऊ नये.’ खरगे सत्यच बोलले. RRR चे पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना भाजपातर्फे राज्यसभेत खासदार केले गेले. यावर मंत्री पियुष गोयल नेमके तेच म्हणाले, ज्याचा उल्लेख खरगे यांनी केला. ‘मोदी श्वास घेत आहेत म्हणून जग चालत आहे,’ एवढंच सांगायचे बाकी आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 09:53 IST