Premium

“युगपुरुष सोडा, तुम्ही पुरुष असता तरी…”, उपराष्ट्रपतींच्या ‘त्या’ विधानावरून राऊतांची मोदींवर टीका!

संजय राऊत म्हणाले, “२०२४ नंतर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. कोण युगपुरुष आहेत, कोण महापुरुष आहेत हे आपण…!”

sanjay raut jagdeep dhankhar narendra modi
संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या एका विधानाची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना जगदीप धनखड यांनी त्यांची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी केल्यामुळे त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या विधानाचा संदर्भ देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते उपराष्ट्रपती?

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवाी जैन तत्वज्ञानी श्रीमद राजचंद्र यांना समर्पित एका कार्यक्रमात बोलताना मोदींची तुलना महात्मा गांधींशी केली. “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेने आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले आहे”, असं ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यामुळेच दिघेंना टाडा लागला- शिंदे गटाचा आरोप…

उपराष्ट्रपतींच्या या विधानावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली असताना आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनीही त्यावरून टीका केली. “२०२४ नंतर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. कोण युगपुरुष आहेत, कोण महापुरुष आहेत हे आपण ठरवत नाही. जनता ठरवते, इतिहास ठरवतो, जगभरातली जनता ठरवते. महात्मा गांधींना अवघ्या जगानं मानलं. जर सत्तेत बसणारे लोक पुरुष जरी असते तर जम्मू-काश्मीरमध्ये दररोज आपल्या जवानांची हत्या झाली नसती. लडाखमध्ये चीन घुसला नसता. पंतप्रधानांचा आम्ही आदर करतो कारण ते पंतप्रधान आहेत. त्या पदाचा आम्ही आदर करतो”, अशा शब्दांत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

“तेलंगणात भाजपा जिंकणार नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी तेलंगणात महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते प्रचारासाठी जात असल्यावरून टीका केली आहे. “तेलंगणात भाजपा जिंकणार नाही. तिथे काँग्रेस व केसीआर यांच्यात लढाई चालली आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकरी आक्रोश करतोय. अशावेळी राज्याच्या प्रमुखांनी राज्यात असायला पाहिजे की तिथे जाऊन प्रचार करायला पाहिजे? तुम्हाला खोके पाठवायचे असतील तर पाठवा. पण आज खोक्यांची मदत शेतकऱ्याला पाहिजे. तुम्हाला तिथे कोण विचारतंय? इथे थांबा की. तुमच्याशिवाय तेलंगणात निवडणुका होणार नाहीयेत का?” असा सवालही राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut slams pm narendra modi on vice president jagdeep dhankhar comparing with mahatma gandhi pmw

First published on: 28-11-2023 at 10:30 IST
Next Story
प्रियकराला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची संमती देणाऱ्या आईला ४० वर्षांच्या कारावासाची शिक्षा