वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, शिष्य दीपक लोधी उर्फ रसिक दुलारी शरण यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. लोधी यांच्या खोलीत सापडलेला ग्राइंडर, गुप्तांगाला झालेली जखम आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ यामुळे या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संत प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा
पोलीस या घटनेचा तपास आत्महत्या म्हणूनच करत असले तरी, लोधी यांनी उडी मारण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं? तसेच त्यांच्या मोबाईलवरून काही चॅट्स, व्हिडिओ किंवा इतर डेटा डिलीट करण्यात आला आहे का? याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दीपक लोधी यांनी दोन वर्षांपूर्वी संत प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांचे नाव ‘रसिक दुलारी शरण’ असे ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी वृंदावनमधील गुरु कृपा कुंज आश्रमाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी काय घडलं?
दीपक लोधी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर दीपक सकाळी १०:२५ वाजता त्यांच्या खोलीतून बाहेर पडले, यावेळी त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. काही वेळ ते खोलीबाहेरच थांबले आणि नंतर तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेले. तिथे ते आधी बसले आणि नंतर सुमारे १० सेकंद जमिनीवर झोपले. त्यानंतर अचानक उठून १०:३६ वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून खाली उडी मारली.
पोलीस तपास सुरु
या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे गृहीत धरले आहे. परंतु, उडी मारण्यापूर्वीच्या काही मिनिटांत काय घडले, यावर पोलीस सध्या तपास करत आहेत.
विविध अंगांनी तपास
तपासादरम्यान रसिक शरण यांच्या खोलीत एक कटर आढळले आहे. तसेच त्यांच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, इमारतीवरून उडी मारण्यापूर्वी त्यांना ही दुखापत कशी झाली आणि का झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृंदावनचे पोलीस अधिकारी संदीप कुमार सिंह यांनी, यामागचे खरे कारण तपासाअंती स्पष्ट होईल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेरे जप्त केले आहेत, तसेच मोबाईल फोन डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. मृत्यूआधी त्यांनी फोनमधील फोटो, व्हिडिओ, मेसेज किंवा चॅट्स डिलीट केले होते का? आणि तो डेटा पुन्हा मिळवता येईल का? याचा शोध घेतला जात आहे.
