देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाला शेतकरी विरोधी म्हटलंय. तसेच शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असं आवाहन केलंय. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी मेरठमध्ये पत्रकार परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली.
योगेंद्र यादव यांनी म्हटलं, “आज (६ फेब्रुवारी) क्रांतीचं ठिकाण असलेल्या मेरठमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाबाबत हन्नान मोल्ला आणि राकेश टीकैत यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यात एकच संदेश आहे की शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या.”




“मुजफ्फरनगर हिंदू-मुस्लीम सामन्याचं मैदान नाही”
राकेश टीकैत म्हणाले, “पश्चिम उत्तर प्रदेशला विकासाची चर्चा करायची आहे. हिंदू, मुस्लीम, जिन्ना, धर्माच्या गोष्टी करणाऱ्यांना मतांचं नुकसान होईल. मुजफ्फरनगर हिंदू-मुस्लीम सामन्याचं मैदान (स्टेडियम) नाही.”
“आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलनात जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हटलं नाही”
“देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचं नावही घेत नाहीत. आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलना दरम्यान जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हणणं टाळलं आहे. त्यांच्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत,” असं आवाहन टीकैत यांनी केलंय.
शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या अपूर्ण असल्याचा आरोप
दरम्यान, याआधी देखील संयुक्त किसान मोर्चाने ४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या नागरिकांना भाजपाला शिक्षा देण्याचं आवाहन केलं होतं. तसेच भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांना शिक्षा द्यावी, असं म्हटलं होतं. शेतीमालाला हमीभावावर समिती स्थापन करणे आणि शेतकऱ्यांविरोधातील प्रकरणे मागे घेण्यासह अनेक मागण्या अपूर्ण असल्याचं शेतकरी नेत्यांनी म्हटलंय.
हेही वाचा : “जर ते आंदोलक होते तर त्यांच्या हातात भाजपाचा झेंडा कसा काय?”
उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीपासून मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात ५८ जागांसाठी मतदान होईल.