सिंधू बॉर्डरवर हात पाय तोडून करण्यात आलेल्या हत्येवर संयुक्त किसान मोर्चाची भूमिका काय? शेतकरी नेते म्हणाले…

दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चानं आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Farmer leaders Darshan pal, BS Rajewal, Gurnam Singh Charuni, Jagjit Singh Dallewal, during a press conference
संयुक्त किसान मोर्चाचे नेते (संग्रहित छायाचित्र)

दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चानं आपली भूमिका स्पष्ट केलीय. “लोकशाही पद्धतीने आणि शांततामय मार्गाने सुरू असलेलं शेतकरी आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोध करतं. या हत्येचा संयुक्त किसान मोर्चा निषेध करतो आणि दोषींना कायद्याप्रमाणे शिक्षा करण्याची मागणी करतो,” अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केलीय.

संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “आज (१५ ऑक्टोबर) सकाळी सिंधू सीमेवर लखबीर सिंह (तरनतारन) या पंजाबच्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करत हत्या करण्यात आली. या घटनेची जबाबदारी घटनास्थळावरील एक निहंग समूहाने घेतलीय. त्या व्यक्तीने सरबलोह ग्रंथाचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्यानं ही हत्या केल्याचं त्यांनी म्हटलंय. मृत व्यक्ती मागील काही दिवसांपासून या निहंग समुहासोबतच राहत असल्याचीही माहिती आहे.”

“चौकशी करुन दोषींना कायद्यानुसार शिक्षा द्यावी”

“संयुक्त किसान मोर्चा या नृशंस हत्येची निंदा करतो. या घटनेतील निहंग समूह किंवा मृत व्यक्ती दोघांसोबत संयुक्त किसान मोर्चाचा कोणताही संबंध नाही. आम्ही कोणत्याही धार्मिक ग्रंथ किंवा प्रतिकाच्या अपमानाविरोधात आहोत. मात्र, त्या आधारे कोणत्याही व्यक्ती अथवा समुहाला कायदा हातात घेण्याची परवानगी मिळत नाही. या हत्या आणि धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेची चौकशी करुन दोषींना कायद्यानुसार शिक्षा द्यावी,” अशी मागणी संयुक्त किसान मोर्चानं केलीय.

“शेतकरी आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोध करतं”

“संयुक्त किसान मोर्चा कोणत्याही कायदेशीर कारवाईत पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करेल. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेलं हे आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोध करतं,” असंही शेतकरी नेत्यांनी निवेदनात नमूद केलंय. हे निवेदन शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल, डॉ. दर्शन पाल, गुरनाम सिंह चढूनी, हन्नान मोल्ला, जगजीत सिंह डल्लेवाल, जोगिंदर सिंह उगराहां, शिवकुमार शर्मा (कक्काजी), युद्धवीर सिंह, योगेंद्र यादव या सर्वांनी एकत्रित जारी केलं आहे.

हेही वाचा : Farmers Protest : सिंधू बॉर्डरवर झालेल्या ‘त्या’ हत्येमागे कोण? शेतकरी नेत्यांचा गंभीर आरोप

या घटनेविषयी माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, “सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे आज (१५ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळला. याला कोण जबाबदार आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanyukta kisan morcha clear stand on brutal murder at singhu border farmer protest site pbs