चिनी उद्योजिका आणि एटिकेट एक्सपर्ट सारा जेन हो यांनी आपल्या ४ महिन्यांच्या बाळाबरोबरच्या सकाळच्या दिनक्रमाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी आई झालेल्या सारा यांनी मातृत्वाच्या अनुभवांबद्दल सांगताना आपल्या बाळाला शांत करण्यासाठी हनुमान चालीसा ऐकवत असल्याचं म्हटलं आहे. सारा यांनी सांगितलं की, ‘बर्निंग मॅन’मध्ये त्यांच्या भारतीय मित्रांकडून त्यांना हनुमान चालीसाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्या दररोज सकाळी ते लूपवर ऐकवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘बाळ ५ सेकंदांत शांत होतं, २ मिनिटांत झोपतं’
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सारा यांनी असा दावा केला की, बाळ रडत असेल किंवा खूप अस्वस्थ झालं असेल, तर हनुमान चालीसा लावल्याने त्याचा मूड पटकन बदलतो. “बाळ अस्वस्थ असेल किंवा खूप रडत असेल, तेव्हा हनुमान चालीसा लावते. ५ सेकंदांत ते शांत होतं आणि २ मिनिटांत झोपी जातं,” असा अनुभव त्यांनी शेअर केला.
सारा यांनी मातृत्वातील इतर काही अनुभवही या पोस्टमध्ये सांगितले आहेत. बाळ रडताच आपण लगेच त्याला उचलून घेतो आणि त्याला ‘क्राय इट आऊट’ पद्धतीने रडत ठेवण्यावर आपला विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं. दाव्याला पुष्टी देताना त्यांनी यामागे शास्त्रीय माहिती आणि आकडेवारीचा आधार असल्याचेही आवर्जून स्पष्ट केले.
ब्राम्सचे अंगाईगीत आणि बाळाच्या विकासाबाबत दावा
सारा यांनी दररोज आठ मिनिटे संगीतकार ब्राम्सचे अंगाईगीत ऐकवल्याने बाळाच्या मेंदूचा विकास वेगाने होण्यास मदत होते, असंही म्हटलं. यामागे पुरावा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या या दाव्याची वैज्ञानिक वैधता किंवा त्याचा नेमका संदर्भ त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलेला नाही.
सरोगसी आणि बाळाच्या आहाराबाबतही सांगितलं
आपल्या सरोगसीच्या प्रवासातील काही खास तपशील शेअर करताना सारा यांनी सांगितले की, बाळाला शेंगदाणे आणि सोया दूध यांसारख्या पदार्थांची ॲलर्जी होऊ नये म्हणून, ती सरोगेट मातेला आवर्जून शेंगदाणे आणि सोया दूध पाठवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पदार्थांच्या सेवनामुळे बाळाची या अन्नपदार्थांशी लवकर ओळख होईल आणि पुढे जाऊन ॲलर्जीचा धोका टाळता येईल, असा त्यांचा समज आहे. मात्र, या पद्धतीमागे कोणतीही वैज्ञानिक सिद्धता किंवा शास्त्रीय आधार आहे की नाही, याबाबत आपल्याला खात्री नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. याशिवाय बाळाला भविष्यात पाळीव प्राण्यांपासून ॲलर्जी होऊ नये, या उद्देशाने त्या मित्र आणि शेजाऱ्यांच्या कुत्र्यांच्या संपर्कातही आणत असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाळाला गवत, दगड आणि मातीवर अनवाणी चालवण्याचा प्रयत्न
सारा यांनी आपल्या दिनक्रमातील आणखी एक गोष्ट सांगितली. त्या बाळाच्या अनवाणी पायांचा नैसर्गिक पृष्ठभागांशी संपर्क करून देण्याला ‘ग्राउन्डिंग’ म्हणतात. गवत, दगड किंवा मातीसारख्या नैसर्गिक पृष्ठभागांचा स्पर्श बाळाच्या मज्जासंस्थेविषयक आणि शारीरिक विकासासाठी उपयुक्त असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. मात्र, या दाव्याबाबतही त्यांनी कोणताही स्वतंत्र वैज्ञानिक पुरावा दिलेला नाही.
हनुमान चालीसेच्या उल्लेखावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सारा यांच्या पोस्टमधील हनुमान चालीसेच्या उल्लेखावर अनेक भारतीय युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांच्या बाळाला हनुमान चालीसा ऐकवण्याच्या अनुभवाचं कौतुक केलं. एका युजरने हनुमान चालीसा ही शक्तिशाली हिंदू प्रार्थना असल्याचं म्हणत सारा यांच्या बाळासाठी शुभेच्छा दिल्या. तर एका भारतीय आईने आपल्या मुलींनाही लहानपणी हनुमान चालीसा ऐकवत असल्याचा अनुभव शेअर केला. मातृत्वाच्या अनुभवांवर आधारित सारा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
