काम, कामाचा ताण आणि त्यानंतर येणारा थकवा… कॉर्पोरेट जगतात सध्या याच मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू आहे. अशातच, मुंबईत जन्मलेल्या आणि सध्या दुबईत आपलं व्यावसायिक साम्राज्य उभारणाऱ्या एका भारतीय वंशाच्या महिला उद्योजिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
“माझ्या टीममधील एकही कर्मचारी वीकेंडला (शनिवार-रविवार) काम करणार नाही आणि संध्याकाळी ६ नंतर एकाही क्लायंटचा फोन उचलला जाणार नाही,” असा स्पष्ट आणि ठाम नियमच या महिला उद्योजिकेनं आपल्या कंपनीत लागू केला आहे. सारा शाह असे या इंटिरियर डिझायनर आणि उद्योजिकेचं नाव असून, त्यांच्या या ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ मॉडेलनं सध्या कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घातला आहे.
क्लायंट गमावले, पण कर्मचाऱ्यांचे स्वातंत्र्य नाही!
दुबईत ‘एसेस डिझाइन स्टुडिओ’ चालवणाऱ्या सारा शाह यांचा व्यवसाय आज तब्बल १८ शहरांमध्ये पसरलेला आहे. कामाचा व्याप मोठा असतानाही त्यांच्या कंपनीत ‘सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते संध्याकाळी ६’ असा शिस्तबद्ध नियम पाळला जातो. कामाचा कितीही ताण असला किंवा प्रोजेक्टची डेडलाइन जवळ आली तरीही कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम करण्याची परवानगी दिली जात नाही.

विशेष म्हणजे, या धोरणामुळे सारा शाह यांना अनेक मोठे क्लायंट्स गमावावे लागले आहेत. अनेक क्लायंट्सची मागणी असते की, डिझायनर्सनी शनिवारी उपलब्ध असावे किंवा रात्री उशिरापर्यंत काम करावे. मात्र, सारा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “मला नियम तोडण्यापेक्षा क्लायंट्स सोडून गेलेले परवडतील!”
“कामाचा ताण वाढला किंवा प्रोजेक्ट मागे पडू लागला, तर मी कर्मचाऱ्यांवर ओव्हरटाइम लादण्याऐवजी नवीन माणसाची भरती करते.” – सारा शाह, उद्योजिका
“सर्जनशीलता ही नळ नाही, तर विहीर आहे!”
आपल्या या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना सारा शाह यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये (LinkedIn) अतिशय सुंदर रूपक वापरले आहे. त्या म्हणतात, “मी पूर्वी सर्जनशीलतेला (Creativity) नळाच्या पाण्यासारखं समजायचे. नळ सुरू केला की पाणी वाहत राहतं. पण आता मला समजलंय की, सर्जनशीलता ही नळासारखी नाही, तर विहिरीसारखी आहे. विहीर आटू शकते. एकदा का ती आटली, तर तुम्ही कितीही जोर लावला तरी पाणी लगेच परत येत नाही. डिझायनरला विश्रांती मिळाली नाही, तर त्यांची सर्जनशीलता हळूहळू संपते.”
कामाच्या सुरुवातीच्या दिवसांत सारा स्वतःही उशिरापर्यंत काम करायच्या, मुलांसोबतचे रात्रीचे जेवण चुकवायच्या आणि वीकेंडलाही काम करायच्या. पण त्यांच्या लक्षात आले की, उशिरापर्यंत जागून आणि मानसिक ताणाखाली केलेले काम हे दर्जेदार असतेच असे नाही. याउलट, व्यवस्थित विश्रांती घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कल्पना अधिक प्रभावी आणि आकर्षक असतात.
मायक्रोसॉफ्ट, जपानचं उदाहरण अन् ‘बर्नआऊट’चा धोका
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सारा यांनी २०१९ मधील ‘मायक्रोसॉफ्ट जपान’च्या प्रयोगाचा दाखला दिला. मायक्रोसॉफ्टने जपानमध्ये आठवड्यातून केवळ ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला होता. कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सुट्टी देऊनही त्यांच्या उत्पादकतेत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली होती.
थकलेला डिझायनर एका रात्रीत काम करणे बंद करत नाही, तर त्याच्या कामाचा दर्जा हळूहळू घसरत जातो. हे क्लायंटच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो, असेही सारा यांनी नमूद केले.
कॉर्पोरेट जगताला नवा विचार
सध्याच्या काळात कॉर्पोरेट जगतात उशिरापर्यंत काम करणे किंवा २४ तास उपलब्ध राहणे म्हणजेच ‘कामाप्रति निष्ठा’ मानली जाते. अशा काळात सारा शाह यांनी स्वीकारलेला हा मार्ग अत्यंत धाडसी मानला जात आहे.
कामाचा ताण वाढल्यास कर्मचाऱ्यांचे वीकेंड हिरावून घेण्याऐवजी, नवीन टीम मेंबरची भरती करणे ही व्यावसायिकदृष्ट्या महागडी गोष्ट असू शकते. मात्र, कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य जपूनही यशस्वी व्यवसाय कसा उभारावा, याचे एक उत्तम उदाहरण सारा शाह यांनी जगभरातील उद्योजकांसमोर ठेवले आहे.
