सरबजितला वाचविण्यासाठी काय प्रयत्न केले याचे निवेदन सरकारने करणे आवश्यक असून सरबजितच्या मृत्यूवरून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी मगरीचे अश्रू ढाळू नयेत, असा टोला भाजपचे नेते राजीवप्रताप रुडी यांनी गुरुवारी येथे मारला. सरकारचे परराष्ट्र धोरण दुबळे आहे, अशीही टीका त्यांनी केली. अजमल कसाब आणि अफझल गुरू याला फासावर चढविण्यात आल्यानंतर सरबजितच्या कुटुंबीयांनी तसेच गुप्तचर विभागानेही सरबजितच्या जीवितास धोका असल्याचा इशारा दिला होता. असे असताना सरबजितचे प्राण वाचावेत म्हणून योग्य वेळेत कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी रुडी यांनी केली.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि अन्य पक्षांचे आता सरबजितच्या कुटुंबीयांसमोर नक्राश्रू ढाळत आहेत, परंतु सरबजित हा गेल्या आठवडय़ापासून मृत्यूशी झुंज देत असताना हे सर्वजण का मूग गिळून बसले होते, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, अशी मागणी रुडी यांनी केली. सरबजितला वाचविण्यासाठी काय प्रयत्न केले, त्याच्यासाठी आपल्या डॉक्टरांना पाकिस्तानात का पाठविले नाही याचे स्पष्टीकरण सरकारनेही द्यायला हवे, असेही रुडी म्हणाले.