सेल्फी काढणं ही जणू फॅशनच झाली आहे. सेल्फी काढायचा मग ठिकाण आणि वेळ बघतंच कोण? सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना रोज कानावर पडतात. पण आता सेल्फी काढणं भलतंच महागात पडणार आहे. गुवाहटीजवळील कामरुप जिल्हा प्रशासनानं ब्रह्मपुत्रा नदीवरील सरायघाट पुलावर सेल्फी काढण्यास बंदी घातली आहे. सेल्फी काढल्याचे निदर्शनास आल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. येथील नवीन आणि जुन्या पुलावर सेल्फी काढण्यास मनाई आहे. याशिवाय मोटरसायकल अथवा वाहन पार्क केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

ब्रह्मपुत्रावरील नवीन आणि जुना पूल संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या दोन्ही पुलांवर वाहनं पार्क करणं बेकायदा आहे, असं जिल्हा प्रशासनानं आदेशात म्हटलं आहे. तसंच सेल्फी काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे दोन्ही पूल नो पार्किंग झोन आणि नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यासंबंधीची अधिसूचनाच प्रशासनानं जारी केली आहे.

ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या या दोन्ही पुलांवर मोठ्या संख्येनं वाहनं बेकायदा पार्क केली जातात. हे प्रवाशांसाठी धोकादायक आहे. पार्क केलेल्या वाहनांमुळे झालेल्या अपघातांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे. ब्रह्मपुत्रावरील सरायघाट येथील जुन्या पुलाचं दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. या पुलावरील वाहनांची संख्या आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथे दुसरा पूल बांधण्यात आला. यावर्षी जानेवारीत या नवीन पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.