Nepal Flash Flood Tamil Nadu Pilgrims Rescue: नेपाळ-तिबेट सीमेजवळील डोंगराळ भागात ढगफुटीसदृश पाऊस, महापूर आणि दरड कोसळण्याच्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर तामिळनाडूच्या २१ भाविकांची अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली आहे. चिखलाने माखलेल्या उंच कड्यावरून एका महिलेने खाली सोडलेली साडी या ज्येष्ठ भाविकांसाठी जीवनदायिनी ठरली. सुखरूप बचावलेले २१ भाविक शुक्रवारी रात्री विमानाने चेन्नईत दाखल झाले. त्यांनी त्या दीड दिवसांतील अंगावर काटा आणणाऱ्या संघर्षाची कहाणी कथन केली. मात्र, या ताफ्यातील इतर ३६ आणि चेन्नईतील दुसऱ्या एका गटातील ४९ असे एकूण सुमारे ९० भाविक अद्याप बेपत्ता आहेत.
नेमके काय घडले?
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत ५७ भाविक तीन बसमधून रसुवा मार्गे प्रवास करत होते. वेलाचेरी येथील रहिवासी नावू कबीरदास आणि त्यांच्या पत्नी विजया भुवनेश्वरी यांनी आपला हा पुनर्जन्मच असल्याचे सांगितले. भुवनेश्वरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “आमची बस चिखलात अडकल्यामुळे दुरुस्तीसाठी काही मिनिटे थांबली होती. नेमक्या याच काही मिनिटांनी आमचा जीव वाचवला.”
“अचानक बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला आणि वाहनांवर प्रचंड दगडधोंडे कोसळू लागले. जणू धरण फुटल्यासारखा पाण्याचा लोंढा आमच्या दिशेने धावून आला,” अशी आठवण कबीरदास यांनी सांगितली. नेपाळी चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांना तात्काळ खाली उतरून टेकडीच्या दिशेने धावण्याचा इशारा दिला.
कांचिपुरम येथील एका शाळेच्या मुख्याध्यापिका सत्या यांनी सांगितले, “सुरुवातीला आम्हाला केवळ धुळीचे लोट दिसले. पण अवघ्या काही सेकंदांत ७० ते ८० फूट उंचीच्या लाटांसारखा चिखल आणि भलेमोठे खडक वाहून येत होते. असे दृश्य आम्ही आजवर केवळ इंग्रजी चित्रपटांतच पाहिले होते. डोंगरावर चढायला कुठलीही वाट नव्हती; चार फूट वर चढलो की पाच फूट खाली घसरत होतो.”
साडीच्या साहाय्याने टेकडीवर चढाई
जीव वाचवण्यासाठी सुमारे एका मजल्याइतक्या उंच आणि निसरड्या चिखलाच्या कड्यावर चढणे या ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत कठीण होते. त्यावेळी सर्वात आधी वर पोहोचलेल्या पूंगोडी नावाच्या महिलेने प्रसंगावधान राखले. त्यांनी अंगावर स्वेटर घालून आपली साडी सोडली आणि तिचा पदर खाली सोडला.
भाविकांनी एका हातात तेथील केबल वायर आणि दुसऱ्या हातात साडी घट्ट पकडून एकेकाला वर खेचले. एका वृद्ध महिलेला चढणे अशक्य झाल्याने त्यांच्या कमरेभोवती साडी बांधून संपूर्ण गटाने त्यांना थेट वर ओढून घेतले. वाटेत चिखलात अडकलेल्या आणखी एका व्यक्तीला या पथकाने सुरक्षा दलांच्या मदतीने वाचवले.
हेलिकॉप्टरने बचावकार्य
डोंगरावरील सशस्त्र पोलीस दलाच्या तळावर पोहोचल्यानंतर या भाविकांना पाणी आणि बिस्किटे मिळाली. दुसऱ्या दिवशी काटेरी झुडपे आणि दरीच्या अरुंद काठावरून तीन तास पायी चालत हे सर्वजण हेलिकॉप्टर रेस्क्यू पॉइंटपर्यंत पोहोचले. तिथून लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आणि नंतर दिल्लीमार्गे चेन्नईला आणण्यात आले. या धावपळीत अनेकांचे पासपोर्ट आणि मौल्यवान कागदपत्रे वाहून गेली आहेत.
९० भाविकांचा शोध सुरू
तामिळनाडूचे मंत्री ए. राजमोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या राज्यातील ४०० हून अधिक नागरिकांपैकी ९० भाविकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये चीनच्या हद्दीतील ग्यिरॉंग पोर्ट इमिग्रेशन कार्यालयाजवळ अडकलेल्या ४९ जणांच्या गटाचाही समावेश आहे. तामिळनाडू सरकारच्या वतीने नवी दिल्लीत विशेष समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असून, उर्वरित बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यासाठी नेपाळ सरकार, भारतीय दूतावास आणि लष्कराशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सूचनेनुसार मंत्री आधव अर्जुन, राजमोहन, के. थेन्नारसू आणि आर. विनोद यांनी बचावकार्याच्या मोहिमेसाठी नवी दिल्लीत तळ ठोकला आहे. बेपत्ता असलेल्यांची स्थिती जाणून घेण्याचे आणि ज्यांनी आपले पासपोर्ट व इतर कागदपत्रे गमावली आहेत, अशांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सरकारने सांगितले.
