पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ यांनी काश्मीर प्रश्न त्यांच्या विषयसूचीवर कायम असल्याचे म्हटले असले तरी त्याचा भारताच्या पाकिस्तानशी वाटाघाटींवर परिणाम होणार नाही असे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तानने थांबलेली संवाद प्रक्रिया पुन्हा चालू करण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे समपदस्थ नवाझ शरीफ यांनी रशियात याबाबत संयुक्त निवेदन जारी केले होते, पण त्यात काश्मीरचा उल्लेख नव्हता, त्यामुळे पाकिस्तानात नवाझ शरीफ यांच्या सरकारवर टीका झाली होती, त्याची धार कमी करण्यासाठी अजिज यांनी नंतर काश्मीर प्रश्न पाकिस्तानच्या विषयसूचीवर असल्याचे सांगितले होते.
भारताच्या सूत्रांनी सांगितले, की भारत सरकार संयुक्त निवेदनातील उद्देशांना बांधील असून, रशियातील उफा येथे कबूल केल्याप्रमाणे दोन्ही देशांतील संवादाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सरताझ अजिज यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे मोदी-शरीफ यांच्या भेटीतील कृतीस अनुकूल प्रस्तावांवर परिणाम होणार नाही. अजिज यांनी केलेली वक्तव्ये म्हणजे उफा चर्चेत दिलेल्या आश्वासनांवर कोलांटउडी आहे असे मानता येणार नाही, कारण दोन्ही देशांत वाटाघाटींची प्रक्रिया चर्चेतून सुरू करण्याचे ठरले असेल तर असे निष्कर्ष काढणे हे योग्य ठरणार नाही. कारण चर्चा अजून सुरू झालेली नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर काय सांगतो हे आम्हाला महत्त्वाचे आहे. त्यांच्या देशपातळीवर ते काय सांगतात याला महत्त्व देण्याचे कारण नाही. संयुक्त निवेदनात जे निर्णय दिले आहेत त्यावर पाकिस्तान अंमलबजावणी करतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.