भारत आशियातील महाशक्ती असल्याप्रमाणे वागत असून आपलीच विषयसूची त्यांनी लादून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेत ती पुढे रेटून उफा कराराचे उल्लंघन केले आहे, असा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी केला आहे. पाकिस्तान ही चर्चा रद्द होण्यास कारणीभूत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
अझीझ यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतली व नंतर भारत स्वत:ला प्रादेशिक महाशक्ती समजू लागला. पाकिस्तानकडे अणुशक्ती म्हणजे अणुबॉम्ब आहेत याचा भारताला सोयीस्कर विसर पडला. आमचे संरक्षण कसे  करायचे हे आम्हाला माहिती आहे. भारताला त्यांच्या अटीवर संबंध सुधारण्यासाठी चर्चा हवी होती म्हणजेच त्यांना फक्त व्यापार व इतर विषयांवर चर्चा हवी होती. काश्मीर हा जर प्रश्न नसेल तर सात लाख भारतीय सैन्य तेथे पाकव्याप्त काश्मीरमध्ये का तैनात केले आहे, हे समजत नाही. काश्मीर प्रश्न सोडवला जावा असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटते आहे. आताच्या प्रकरणात भारताला त्यांच्या युक्तया अपयशी ठरतात हे लक्षात आले आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. पाकिस्तान चर्चेपासून दूर पळत नाही पण पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची ‘रॉ’ ही गुप्तचर संघटना खतपाणी घालीत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सल्लागार पातळीवर होणारी चर्चा अझीझ यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत गटांशी चर्चा करण्याचा हट्ट धरल्याने रद्द करण्याची वेळ आली असे भारताचे म्हणणे आहे. चर्चा रद्द केल्याची घोषणा पाकिस्ताननेच केली होती.