सरताझ अझीज यांचे निवेदन
भारत व पाकिस्तान यांच्या परराष्ट्र सचिवांची बैठक १४ व १५ जानेवारीला होत असून त्यात र्सवकष संवाद होणार आहे असे असले तरी त्या बोलणीच्या फलश्रुतीबाबत कुणीही अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत असे पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांनी सांगितले.
अझीज यांनी सिनेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ डिसेंबरच्या धावत्या लाहोर भेटीबाबत धोरणात्मक निवेदन केले, परराष्ट्र सचिवांमध्ये जानेवारीत होणाऱ्या चर्चेसाठी दहा विषय निवडण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
संवादाची प्रक्रिया आव्हानात्मक असते कारण त्यात महत्त्वाचे प्रश्न चर्चेला येतात व त्यावरील निर्णय कठीण असतात. संवाद प्रक्रियेत कुणीही अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. दोन्ही देशातील चर्चेत प्रगती होण्यास वेळ लागेल असे सांगून ते म्हणाले की, मोदी यांचा लाहोर दौरा ही सदिच्छा भेट होती व पाकिस्तान व भारतातील लोकांनी तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने या भेटीचे स्वागत केले आहे. मोदी यांच्याबरोबरच्या व्यक्तींना व्हिसा नसताना लाहोरला भेट दिल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. मोदी व त्यांचे ११ सहकारी ७२ तासांचा व्हिसा घेऊन आले होते व सगळी प्रक्रिया त्यात राबवली गेली होती. त्यांच्यातील काही जण विमानतळावर थांबवले होते. कुणाही परदेशी व्यक्तीला आम्ही वैध व्हिसाशिवाय परवानगी दिलेली नाही.
विरोधी नेते ऐताध अहसान यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान यांच्या पंतप्रधानांमध्ये गेल्या वर्षी काठमांडूत कुठलीही गुप्त बैठक झाली नव्हती. भारताने त्यांची शत्रुत्वाची भूमिका बदलली आहे त्याची कारणे आंतरराष्ट्रीय दबाव, भारतातील दबाव गट व पाकिस्तानातील सकारात्मक लोकशाही ही आहेत.