अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यात या दोन देशांमध्ये करण्यात आलेल्या करारांमुळे दक्षिण आशियात शस्त्रस्पर्धा वाढेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
ओबामा यांच्या भारत भेटीत अमेरिका व भारत यांच्या दरम्यानच्या अणुकराराची कोंडी फुटली होती, तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणखी १० वर्षांनी वाढवण्याचे दोन्ही देशांनी ठरवले होते. यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानने हे वक्तव्य केले आहे.
या करारांमुळे होणाऱ्या संभाव्य असमतोलाची, तसेच त्यावर उपाययोजना करण्याचे मार्ग आणि साधने यांची पाकिस्तान तपासणी करत आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी ‘ओबामांच्या भारत भेटीचे फलित’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात बोलताना सांगितले.
दक्षिण आशियात युद्धविषयक स्थैर्य राहावे, याची पाकिस्तानला प्रामुख्याने काळजी आहे. ओबामा यांच्या दुसऱ्या भारतभेटीपूर्वीच पाकने त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जोरकसपणे पोहोचवली होती, परंतु अमेरिकेने पाक सरकारच्या काळजीकडे दुर्लक्ष केले, असे अझीझ म्हणाले. भारताने अमेरिका आणि रशियाकडून मोठय़ा प्रमाणात केलेली शस्त्रखरेदी, तसेच क्षेपणास्त्रे व इतर शस्त्रांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध, यामुळे दक्षिण आशियात आधीच असलेला पारंपरिक आणि आण्विक शस्त्रांचा असमतोल वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पाकिस्तान व भारत या दोन देशांमध्ये तणाव वाढलेला असताना, तसेच नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना युद्धविषयक असमतोल आणखी बिघडणे चिंताजनक आहे, असे अझीझ म्हणाले.