अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याची घटना मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात जवळपास ८ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.

राम मंदिर देणगी कथित अपहार प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी देखील आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिलेले आहेत. दरम्यान, श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित अपहार प्रकरणावरून मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

यातच आता उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी राम मंदिर देणगी कथित अपहार प्रकरणाबाबत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘ज्यांनी आपलं दान खऱ्या श्रद्धेनं दिलं नव्हतं, कदाचित त्यांच्या देणग्यांची चोरी झाली असावी’, असं वक्तव्य सतीश महाना यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

सतीश महाना यांनी नेमकं काय म्हटलं?

“ज्यांना वाटतं की त्यांचं दान चोरीला गेलं आहे, त्यांनी कदाचित ते दान खऱ्या भक्तीभावाने दिलं नसावं. त्यामुळे कदाचित त्यांचं दान चोरीला गेलं असावं. मात्र, आम्ही दिलेलं दान मंदिराच्या कामात लागलं आहे. मंदिराचं सध्याचं स्वरूप हाच त्याचा पुरावा आहे”, असं वक्तव्य सतीश महाना यांनी केलं होतं.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी राम मंदिर देणगी कथित अपहार प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर अखेर सतीश महाना यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

सतीश महाना यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“देणगी म्हणून दिलेले पैसे कोणी कधी परत मागितले आहेत का? आपण कोणतीही देणगी देतो तेव्हा ती परत मागितली गेली आहे, असं कधी आपण ऐकलं का? पण जर कोणी मागणी केली, तर ते पैसे परत करण्याची तयारी आहे. मी मघाशी बोलल्याप्रमाणे प्रभू श्रीरामाच्या चरणी मी एक छोटीशी रक्कम दान केली होती. मला वाटतं की ते माझं दान या मंदिराचा एक भाग आहे. यात नक्कीच लोकांचे पैसे लागले आहेत. मात्र, जर कोणाला ते पैसे परत हवे असतील आणि ज्यांना असं वाटतं की त्यांचे पैसे चोरीला गेले असावेत, त्याबाबत सरकार आणि ट्रस्ट कारवाई करत आहे”, असं सतीश महाना यांनी म्हटलं.

“संबंधित व्यक्ती कोणत्याही पदावर असो, त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे, हा एक भाग झाला. पण राम जन्मभूमी आंदोलनासाठी संघर्ष करणाऱ्या संपूर्ण संघटनेत केवळ चोरच भरलेले आहेत, हा आरोप कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. ज्यांनी चोरी केली, त्याचं समर्थन कोणीही करत नाही. या देशातील कोणत्याही संस्थेत कधीच चोरी झाली नाही का? ज्यांनी चोरी केली त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत सर्वांचं एकमत आहे. पण त्या संस्थेशी संबंधित असलेल्या प्रत्येकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं पूर्णपणे अन्यायकारक आहे”, असं सतीश महाना यांनी म्हटलं आहे.