मुंबई : पंजाबमध्ये पोलिसांनी बनावट चकमकींद्वारे केलेल्या शीख तरुणांच्या हत्यांचे प्रकरण प्रकाशात आणणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आधारित ‘सतलज’ हा चित्रपट ३ जुलैला ‘झी ५’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला.मात्र, दोनच दिवसांत रविवारी हा चित्रपट ‘झी ५’ वरून हटवण्यात आला. या प्रकरणी चित्रपटातील मुख्य अभिनेता दिलजीत दोसांजसह अनेकांनी समाजमाध्यमांवरून नाराजी व्यक्त केल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

पंजाबमध्ये १९८० ते १९९० या कालावधीत पंजाब पोलिसांनी हजारो शीख तरुणांचे अपहरण करून त्यांना बनावट चकमकींद्वारे ठार मारल्याचे मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांनी उघड केले होते. या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या खालरा यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘पंजाब ९५’ हा हनी त्रेहान दिग्दर्शित चित्रपट २०२२ पासून प्रदर्शनासाठी झगडतो आहे. या चित्रपटाचे शीर्षक, खालरा यांचे नाव बदलण्यापासून सेन्सर बोर्डाने १२० कट्स सुचवले होते. निर्मात्यांना हे कट्स मान्य नाहीत. हाच चित्रपट कुठलीही पूर्वप्रसिद्धी न करता ‘सतलज’ या नावाने ३ जुलैला ‘झी ५’वर प्रदर्शित करण्यात आला होता.

सरकारची भूमिका

ओटीटीवरील चित्रपट प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारित येत नाही, मात्र ‘माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१’अंतर्गत कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे चित्रपट प्रदर्शकांना बंधनकारक आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. ‘सतलज’ चित्रपटाचे ‘झी ५’ वरील प्रदर्शन हे याच माहिती तंत्रज्ञान नियमांच्या आधारे सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि वयोगटांनुसार आशय वर्गीकरण केले गेले नसल्याने थांबवण्यात आले आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे

या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी येणार, हे अपेक्षितच होते. कुठल्याही कायदेशीर मार्गाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी मिळत नसल्याने अखेर ओटीटीवर पूर्वप्रसिद्धी न करता चित्रपट प्रदर्शित करावा लागला. त्यामुळे जेव्हा सरकारला कुणकुण लागेल तेव्हा चित्रपट प्रदर्शन थांबवले जाणार याची कल्पना होती. – दिलजीत दोसांज, अभिनेता