Viral News Prison Love Story: Assistant Superintendent Firoza Khatun marries convict Dharmendra Singh in Satna : मध्यप्रदेशातील सतना येथे एका कारागृहातील महिला अधिकाऱ्याने त्याच कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगलेले व्यक्तीशी लग्नगाठ बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचे हे प्रेमसंबंध तो व्यक्ती कारागृहात असतानाच सुरू झाले होते या संबंध आता आंतरधर्मीय विवाहात रुपांतरित झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, सतना मध्यवर्ती कारागृहात सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करत असलेल्या फिरोजा खातून यांची भेट धर्मेंद्र सिंग याच्याशी झाली. त्यावेळी खातून या कारागृहात वॉरंट इन-चार्ज म्हणून काम पाहत होत्या. तेव्हा धर्मेंद्र सिंग हा त्याच कारागृहात २००७ मध्ये एका नगरसेवकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
कारागृहात असताना सिंग हा कारागृह प्रशासनाला वॉरंटशी संबंधित कामांमध्ये मदत करत असे, ज्यामुळे तो खातून यांच्या सतत संपर्कात येत असे. त्यांच्यात कामासंबंधी होणाऱ्या संवादाचे रूपांतर हळूहळू मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले.
जवळपास १४ वर्ष कैद भोगल्यानंतर चांगल्या वर्तवणुकीच्या आधारावर जवळपास चार वर्षांपूर्वी सिंग याची सुटका झाली. तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर या जोडप्याने त्यांचे नाते पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि लग्नगाठ बांधली.
हा विवाहसोहळा ५ मे रोजी छत्तरपूर जिल्ह्यात पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून सिंगने लग्नाच्या पत्रिकेवर आपले नाव बदलले होते. हा विवाह सोहळा वैदिक पद्धतीने पार पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, या आंतरधर्मिय विवाहाला खातून यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही. त्यांच्या कुटुंबातील कोणीही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. विश्व हिंदू परिषद (VHP) जिल्हा उपाध्यक्ष राजबहादूर मिश्रा आणि त्यांच्या पत्नीने कन्यादान केले. या सोहळ्याला बजरंग दलाचे सदस्यही उपस्थित होते.
तुरूंगात फुललेली ही प्रेम कथा अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या जोडप्याने प्रेमासाठी सामाजिक तसेच धर्माची बंधने झुगारून दिल्याने हा विवाह या प्रदेशात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सतना मध्यवर्ती कारागृहाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि तेथील कैद्यांनीही या नवविवाहित दांपत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
