नवी दिल्ली : ‘‘दिल्लीतील सत्य निकेतन इमारत कोसळल्याप्रकरणी केवळ या वसतिगृहाचे मालकच नाही तर दिल्ली महापालिका, तसेच दिल्ली विद्यापीठही जबाबदार आहे,’’ असे ताशेरे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ओढले. ही दुर्घटना सर्वात दुर्दैवी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या सोमवारी सात झाली.
दरम्यान, याप्रकरणी राजस्थानच्या भिवडी येथून अटक करण्यात आलेला इमारतीचा मालक हरिराम आणि त्याच्या पत्नीला दिल्ली न्यायाल्याने १४ दिवसांची न्याायालयीन कोठडी सुनावली. तसेच मुलाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
‘‘बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात दिल्ली विद्यापीठाला अपयश आले, त्यामुळे त्यांना खासगी इमारतींमध्ये पेईंग गेस्ट (पीजी) म्हणून राहणे भाग पडते,’’ असे मत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. तसेच ढिगार्याखाली अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याचे अधिकार्यांना निर्देश दिले. ढिगार्याखालील लोकांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचे केंद्र सरकार, दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस आणि दिल्ली महापालिकेची बाजू मांडणारे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.
याप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शोध आणि बचावकार्य सोमवारीही सुरू राहिले. दुसर्या दिवशी ढिगार्याखालून १२ जणांची सुटका करण्यात यश आले.
काँग्रेसनेही याप्रकरणी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. ‘‘वसतिगृहे तसेच पेइंग गेस्टसाठी भाडे नियंत्रण कायदा लागू करावा आणि या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना एक कोटींची भरपाई द्यावी,’’ अशी मागणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’चे (एनएसयूआय) अध्यक्ष विनोद जाखड आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. डाव्या पक्षांशी संबंधित ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ने सत्य निकेतन येथे धरणे आंदोलन करत याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची तसेच विद्यापीठात आणखी वसतिगृहांची मागणी केली. तर, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने खासगी पेइंग गेस्ट चालक आणि राजकीय नेत्यांचे लागेबांधे याचा तपास करण्याची मागणी केली.
विरोधकांची टीका
सत्य निकेतन इमारत कोसळल्याप्रकरणी भाजप सरकार जबाबदारी घेणे टाळत असल्याची टीका काँग्रेसने केली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, अपघातांपूर्वी कोणताही प्रतिबंधात्मक उपाय न करणे, त्यानंतर केवळ मोठमोठी वक्तव्ये करणे आणि काही निम्नस्तरीय अधिकार्यांना दोष देणे, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे. तर, या दुर्घटनेनंतर आम आदमी पक्षानेही भाजपला लक्ष्य केले. सत्य निकेतनमध्ये अनेक भाजप नेत्यांच्या मालमत्ता असल्याचा आरोप ‘आप’ने केला. प्रत्येक वेळ ढिगार्याखाली आयुष्य, स्वप्ने आणि आकांक्षा दबल्या जातात आणि प्रत्येक वेळी कोणतीही अस्सल कारवाई झाल्याचे आढळत नाही. तुम्ही दायित्वाचा प्रश्न उपस्थित केला की पंतप्रधान स्वत:च दिमागी नक्षल आणि नाराज फूफासारखे अपमानास्पद लेबल लावतात. प्रश्न विचारणार्यांना लज्जित करणे, बदमान करणे आणि गप्प करणे हा त्यांचा हेतू असतो. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस
