Priyank Kharge Savarkar RSS Controversy: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कर्नाटकमधील मंत्री आणि काँग्रस नेते प्रियांक खरगे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मंत्री प्रियांक यांच्या वक्तव्यानंतर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी काँग्रेसह खरगे यांच्यावर टीका केली आहे. राजकीय फाद्यासाठी प्रियांक खरगे वक्तव्य करत असल्याचा आरोप करत सात्यकी यांनी सावरकर आणि आरएसएसचे समर्थन केले. सत्येतून बाहेर असल्याने काँग्रेसचे राजकीय नैराश्य अशा वक्तव्यातून दिसून येते असेही सात्यकी सावरकर म्हणाले.
प्रियांक खरगे नेमकं काय म्हणाले?
प्रियांक खरगेंंनी विनायक दामोदर सावरकरांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबाबत भाष्य केले होते. सुभाष चंद्र बोस इंग्रजांविरोधी चळवळीच्या विरोधात सावरकरांची भूमिका होती, असा आरोप खरगेंनी केला होता. “सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यलढ्यादरम्यान भारतीय सेना उभारत होते, तेव्हा सावरकर हिंदूंना ब्रिटिश सैन्यात सामील होण्याचे आवाहन करत होते… हा त्यांचा इतिहास आहे.”, असे प्रियांक खरगे म्हणाले. दरम्यान, सात्यकी यांनी सावरकरांचे ते आवाहन धोरणात्मक पाऊल होते, असे म्हणत समर्थन केले.
सात्यकी सावरकरांचे प्रत्युत्तर
“भारतीय तरुणांना सैन्यात भरती होण्याचे सावरकरांनी केलेले आवाहन, प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने उचललेले एक धोरणात्मक पाऊल होते. हेच लष्करी प्रशिक्षण घेतलेले तरुण पुढे भारतीय सशस्त्र दलांचा कणा बनले. १९४७ नंतर पाकिस्तानी आक्रमणाविरुद्ध याच सैनिकांनी देशाचे संरक्षण केले”, असे सात्यकी सावरकर म्हणाले. दरम्यान,खरगेंनी यापूर्वी आरएसएसच्या नोंदणीवरुन प्रश्न उपस्थित केला होता.
आरएसएसबाबतही दिले स्पष्टीकरण
“देशभक्तीवर प्रवचन देण्याचा आरएसएसला नैतिक अधिकार नाही. माझ्या मते, ही देशाच्या इतिहासातील सर्वात राष्ट्रविरोधी संघटना आहे,” असे विधान खरगेंनी यापूर्वी केले होते. मंत्री प्रियांक यांनी आरएसएसच्या निधी आणि नोंदणी मागणीही केली होती. सात्यकी सावरकरांनी आरएसएसबाबत बोलताना, “आरएसएसची स्थापना १०० वर्षांपूर्वी एक सामाजिक-सांस्कृतिक चळवळ म्हणून झाली होती. स्वयंसेवकांनी संकटांच्या काळात देशाची सेवा केली आहे, त्यामुळे या संस्थेला व्यावसायिक किंवा सरकारी संस्था म्हणून वागणूक देण्याचा प्रश्नच नाही,” असे म्हणाले. “सावरकर दूरदर्शी नेते होते, त्यांच्यावर मत मांडण्यापूर्वी त्यांचे योगदान वाचून, समजून घेतले पाहिजे,” असेही सात्यकी सावरकर म्हणाले.
