AAP Leader Satyendar Jain Arrest Delhi Jal Board Scam: दिल्ली जल बोर्डमधील कथित घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना अटक केली आहे.
माजी सीईओसह सहा जणांना अटक
दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या नूतनीकरणाच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, निविदा अटींमध्ये फेरफार आणि कट रचण्यात आल्याची तक्रार दक्षता संचालनालयाने केली होती, अशी माहिती दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनातून दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दिल्ली जल बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कोणा कोणास अटक केली?
एसीबीने सत्येंद्र जैन यांच्यासह एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये जल बोर्डाचे माजी सीईओ उदित प्रकाश राय, जल बोर्डाचे माजी कंत्राटी सल्लागार अंकित श्रीवास्तव, ‘एएन एंटरप्रायझेस’चे मालक नागेंद्र यादव, ‘युरोटेकम एनव्हायरन्मेंट’चे मालक राजा कुमार कुरा आणि ‘सृजनहार’चे मालक पंकज वर्मा यांचा समावेश आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या नूतनीकरणाच्या निविदा प्रक्रियेशी संबंधित हे प्रकरण आहे.
१३ जणांविरुद्ध आरोपपत्र
दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांशी संबंधित चार निविदा वाटपातील १७.७ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयाने २०२५ मध्ये सत्येंद्र जैन आणि इतर १३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
नेमके प्रकरण काय आहे?
आप नेते हे दिल्लीचे जलमंत्री असताना, २०२२ मध्ये ही टेंडर वाटप करण्यात आली होती. पापांकलन आणि निलोथी (पॅकेज १), नजफगढ़ आणि केशोपूर (पॅकेज २), कोरोनेशन पिलर, नरेला आणि रोहिणी (पॅकेज ३) आणि कोंडली (पॅकेज ४) मधील विद्यमान १० एसटीपीच्या विस्तारीकरण आणि नूतनीकरणाच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘युरोटेकम एनव्हायरन्मेंटल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि इतरांव्यतिरिक्त दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या तपासाला सुरुवात झाली होती.
