पीटीआय, नवी दिल्ली
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीतील आपचे नेते व माजी मंत्री सत्येंद्र जैन, दिल्ली जल मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश राय आणि अन्य तिघांना दिल्ली न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जैन आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने बुधवारी दुपारी निकाल राखून ठेवला होता.
याप्रकरणी दक्षता संचालनालयाने १० मे २०२४ रोजी एफआयआर नोंदवला असून त्यानंतर दोन वर्षांनी अर्थात ५ ऑगस्ट २०२६ रोजी जैन यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर एकदा दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि आता अटक करण्यात आली, असे सांगत जैन यांच्या वकिलांनी कोणत्याही पुराव्याशिवाय ही कारवाई करण्यात आल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. त्याचप्रमाणे राय हे सध्या मिझोराम राज्य शासनामध्ये सचिव असून त्यांनाही पुराव्याशिवाय अटक झाल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. विशेष न्यायाधीश दिग विनय सिंह यांनी याचिकेवरील निकाल राखून ठेवला.
‘राजकीय कारणामुळे कारवाई’
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली अटक झाली असून ही कारवाई राजकारणाचा भाग आहे, असा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला. आम आदमी पक्षाने जैन यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी जैन यांना अटक होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र दुपारी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करत अटक करण्याचे आदेश दिले. तेव्हा ही कारवाई झाली. अधिकाऱ्यांवर कारवाईचा दबाव का आणला जात आहे, याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे.- अरविंद केजरीवाल, संयोजक, आप
केजरीवाल सरकारच्या काळात झालेले घोटाळे आता उजेडात येत आहेत. दिल्ली विधानसभेत सादर झालेल्या ‘कॅग’च्या १९ अहवालात त्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. तपास यंत्रणांनी आता त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असून अशाच एका गैरव्यवहारात जैन यांना अटक झाली आहे.- रेखा गुप्ता, मुख्यमंत्री, दिल्ली
