साऊथ एशियन युनिव्हर्सिटी अर्थात SAU मध्ये फक्त नरेंद्र मोदींवर व भारतातील एनडीए सरकारवर केलेल्या टीकेचा संदर्भ दिला म्हणून काही विद्यार्थी व एका वरीष्ठ प्राध्यापकावर कारवाई करण्यात आली आहे. परिणामी १३ वर्ष महत्त्वाच्या भूमिका पार पाडणारे ६२ वर्षीय प्राध्यापक शशांक परेरा यांना मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारावी लागली आहे. पीएचडीसाठी इच्छुक एका विद्यार्थ्याने आपल्या शोधप्रबंध प्रस्तावामध्ये चॉमस्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा संदर्भ दिल्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाची माफी मागितली असून परेरा यांनी मात्र तसे करण्यास नकार देत मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. काय आहे नेमका प्रकार? साऊथ एशियन युनिव्हर्सिटीत तब्बल १३ वर्षं समाजशास्र शिकवणारे प्राध्यापक व नावाजलेले सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ शशांक परेरा यांनी नुकतीच मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारली. ३१ जुलै हा त्यांचा विद्यापीठातला शेवटचा दिवस होता. निवृत्तीनंतर महिन्याभराने त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. झालेल्या प्रकारामध्ये विद्यापीठाकडून कशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली, यासंदर्भात त्यांनी परखड भाष्य केलं आहे. परेरा यांच्यावर SAU मध्ये शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली होती. त्याबाबत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले होते. यापैकी सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे मोदींवर व एनडीएवर टीका करणारा मुलाखतीतला संदर्भ असणाऱ्या पीएचडी प्रस्तावपत्राला त्यांनी मंजुरी दिली. यासंदर्भात संबंधित पीएचडी उमेदवार विद्यार्थ्यालाही विद्यापीठ प्रशासनाची जाहीर माफी मागावी लागली. त्यापाठोपाठ परेरा यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र, माफी न मागता त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेण्याचा पर्याय निवडला. चॉमस्की यांच्या मोदींवरील 'त्या' टीकेचा संदर्भ २७ जुलै रोजी इंडियन एक्स्प्रेसनं या प्रकाराबाबत सविस्तर वृत्त दिलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला प्राध्यापक परेरा व संबंधित विद्यार्थ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कास्मीरमधील वंशविज्ञान व राजकारण याबाबतचा शोधप्रबंध करण्याचा हा प्रस्ताव होता. यामध्ये इतर अनेक संदर्भांबरोबरच जगप्रसिद्ध विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नाऑम चॉमस्की यांच्या एका मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला होता. त्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसत आहेत. तसेच, मोदी कट्टर हिंदुत्ववादी परंपरेतून आले असून ते भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाही मोडून काढून तिथे हिंदू तंत्रसत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं विधानही चॉमस्की यांनी केल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, चॉमस्की यांच्या मुलाखतीचा संदर्भ दिला म्हणून विद्यापीठानं संबंधित विद्यार्थी व प्राध्यापक परेरा यांच्यावर कारवाई सुरू केली. यावर परेरा म्हणाले, "यावर तो विद्यार्थी म्हणाला की जर त्याने घेतलेली किंवा संदर्भ दिलेल्या मुलाखतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. मला वाटतं ते योग्यही आहे. पण तो विद्यार्थी आणि माझ्याबरोबर जे झालंय, ते अतार्किक आहे. यावर कुणीच काहीच बोललं नाही. माझ्या विभागातील सहकाऱ्यांनीही मौनच बाळगलं. SAU मध्ये आता हा विरोधाभास उघड होत आहे", असं परेरा म्हणाले. Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका "मी मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला कारण कारवाईच्या प्रक्रियेतून मला न्यायाची कोणतीही शक्यता आता दिसत नाही. कारण मुळात माझ्यावरचे आरोपच अतार्किक आहेत. त्यामुळे जर माझ्याविरोधात ही बेकायदेशीर, अनैतिक कारवाईची प्रक्रिया सुरू केली नसती, तर मी आधी ठरल्याप्रमाणे पुढच्या वर्षी नियमाप्रमाणे निवृत्त झालो असतो. पण ते शक्यच नव्हतं", असंही ते म्हणाले. आता कुणीही वास्तवदर्शी संशोधनासाठी पुढे येणार नाही - परेरा दरम्यान, परेरांनी या प्रकरणाच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. "दुर्दैवाने विद्यापीठाकडून बाळगण्यात आलेल्या सोयीस्कर मौनामुळे आणि अशा भित्रट धोरणाला जाहीर मंजुरी दिल्यामुळे SAU मध्ये कुठलाच टीकात्मक किंवा वास्तववादी संशोधन प्रबंध होणार नाही. कुठल्याच विभागात. शिवाय, कुणीही प्राध्यापक अशा विषयांचे गाईड होऊ इच्छिणार नाहीत", असं परेरा म्हणाले. "चॉमस्कींचा मोदीविरोध जगजाहीर आहे" दरम्यान, नाऑम चॉमस्कींचा विरोध जगजाहीर असल्याचं परेरा म्हणाले. "जे मत आम्ही मांडलेलंच नाही, अशा मतासाठी आम्हाला लक्ष्य केलं जात आहे. चॉमस्कींचा मोदीविरोध ही काही नवी बाब नाही. शिवाय काश्मीरच्या अभ्यासाशी त्याचा तसा काही संबंधही नाही. अशी टीका ते इतरत्रही करतच असतात. जर या लोकांना त्यांच्या विशिष्ट अशा टीकेवर आक्षेप असेल, तर त्यांनी चॉमस्की यांना विचारणा करायला हवी", असंही परेरा म्हणाले.