Saudi Arabia Airstrike in Yemen 20 Killed: सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन अरब राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सौदी अरेबियाने शुक्रवारी येमेनमध्ये बॉम्बवर्षाव केला असून त्यात २० जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. येमेनमध्ये यूएईचे समर्थन असलेल्या साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिल (STC) या संघटनेवर सौदी अरेबियाने हवाई हल्ला केला. STC ही संघटना येमेनमध्ये बंड पुकारणार असल्याचा संशय सौदी अरेबियाला आहे. येमेन हे सौदी अरेबियाच्या शेजारील राष्ट्र असल्याने सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याने सौदी अरेबियाने हवाई हल्ले सुरू केले आहेत. यूएईचे STC या संघटनेला समर्थन असल्याने सौदी अरेबिया व यूएईत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने यूएईच्या जहाजाला लक्ष्य करण्यासाठी मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सौदी अरेबियाने हवाई हल्ला केला. त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण येमेनमध्ये सौदी अरेबियाने फुटीरतावादी संघटना साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलच्या (STC) ठिकाणांवर बॉम्बवर्षाव केला. त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. AFP या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. येमेनमधील हाद्रामौत भागातील STC चा प्रमुख नेता मोहम्मद अब्दुलमलिक याने सौदी अरेबियाने हवाई हल्ला केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सौदी अरेबियाने अल-खासाह कॅम्पवर केलेल्या हवाई हल्ल्यात २० जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक जण जखमी झाल्याचे अब्दुलमलिक म्हणाला. दरम्यान, सौदी अरेबियाच्या सीमालगत असलेल्या हाद्रामौत भागाचा ताबा STC ने घेतल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे.

“सौदी अरेबिया हवाई हल्ले करत राहणार”

फुटीरतावादी संघटना साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलने (STC) येमेनमधील लष्करी तळांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर सौदी अरेबियाने हवाई हल्ला केला आहे. STC ने ताब्यात घेतलेली लष्करी तळे परत मिळवण्यासाठी सौदी अरेबिया हवाई हल्ले थांबवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तणावग्रस्त दक्षिण येमेनमधील एडेन शहरात STC च्या सर्वोच्च नेत्याने सौदी अरेबियाच्या शिष्टमंडळाचे विमान उतरू दिले नाही, असा आरोप येमेनमधील सौदी अरेबियाच्या राजदूतांनी केला आहे. तर सौदी अरेबिया अल कायदा व मुस्लिम ब्रदरहूड सारख्या दहशतवादी संघटनांची मदत घेत असल्याचा आरोप STC चे प्रवक्ते मोहम्मद अल नकिब यांनी केला आहे.

यूएई व सौदी अरेबियात संघर्ष का पेटला आहे ?

सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन अरब राष्ट्रांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. सौदी अरेबियाच्या शेजारील राष्ट्र येमेनमध्ये यूएईचे सैन्य उपस्थित आहे. यूएईचे सैन्य येमेनमधील फुटीरतावादी संघटना साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलला (STC) मदत करत असल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे. साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलला (STC) यूएई मदत करत असल्याने येमेनमध्ये अशांतता निर्माण होईल. येमेनमधील सरकारविरोधात बंड पुकारले जाईल. सौदी अरेबियाच्या सीमेवर तणाव निर्माण होऊन राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी शक्यता सौदी अरेबियाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, शस्त्रास्त्रे व दारूगोळ्याने भरलेली जहाज येमेनमधील मुकल्ला बंदरावर यूएईने पाठवल्याचा संशय सौदी अरेबियाला होता. या जहाजातील शस्त्रे व दारूगोळा फुटीरतावादी संघटना साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलला दिला जाईल, असा संशय सौदी अरेबियाला होता. त्यामुळे जहाजाला नेस्तनाबूत करण्यासाठी सौदी अरेबियाने मंगळवारी मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर सौदी अरेबिया व यूएई या दोन राष्ट्रांमध्ये तणाव वाढला.