Saudi Arabia arrests Indian brothers over Iran funding: अमेरिका-इस्रायल-इराणचे युद्ध तीन महिन्यांपासून चालू आहे. इराणला आर्थिक आणि इतर मदत देण्यासाठी जगभरातून काही लोक पुढे आले. इराणमधील लोकांची मदत केल्याबद्दल सौदी अरेबियातील दोन भारतीय नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावे लागले आहे. मोहम्मद रहीब आणि मोहम्मद जाफर हे मुळचे उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील रहिवासी आहेत. सौदी अरेबियाच्या पोलिसांनी त्यांना मार्चमध्ये अटक केली होती. तेव्हापासून त्यांची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नेमके प्रकरण काय?

मोहम्मद राहीब आणि मोहम्मद जाफर हे उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील रहिवासी होते. त्यांच्या वडिलांना अर्धांगवायू झालेला आहे. पाच वर्षांपूर्वी जाफर सौदी अरेबियाच्या दम्ममला नोकरीसाठी गेले होते. काही काळाने त्यांनी आपल्या भावालाही नोकरीसाठी स्वतःबरोबर नेले.

काही महिन्यांपूर्वी जाफर यांच्या आईने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. इराणमधील लोकांची मला मदत करायची आहे, असे सांगून आईने काही पैसे पाठविण्याची विनंती केली. अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराण विरोधात युद्ध पुकारले. इराणमध्ये क्षेपणास्त्र डागल्यानंतर शाळकरी विद्यार्थी, महिला आणि अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

यानंतर जाफर यांनी आईला सांगितले की, मीच भारतामधील इराणी दूतावासाच्या बँक खात्यात पैसे वळते करतो. यानंतर जाफर यांनी छोट्या भावाच्या मोबाइलमधील अकाऊंटमधून दूतावासाच्या खात्यावर २०० रियाल (भारतीय चलनात ५,००० रुपये) पाठवले.

Ancient India Iran History
 २,५०० वर्षांपूर्वी ‘हिंदूश’ सैन्य इराणसाठी युद्ध का लढले होते?

२७ मार्च रोजी सौदीचे पोलीस जाफर यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी लहान भावाला ताब्यात घेतले. त्याच्या फोनमधून इराणी दूतावासाशी व्यवहार झाल्याचा आरोप ठेवला गेला. ३० मार्च रोजी पोलिसांनी मोठा भाऊ जाफर यांनाही ताब्यात घेतले. तेव्हापासून त्या दोघांची कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला.

कुटुंबियांनी सांगितले की, इराणी दूतावासाला पैसे ट्रान्सफर केल्यामुळे आमच्या दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या पोलिसांनी कुटुंबियांना ते कुठे आहेत किंवा त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल केले आहेत, याची माहिती अद्याप दिलेली नाही.

भारत सरकारकडून मदतीची मागणी

जाफर यांचे वृद्ध वडील हसन अब्बास यांनी एक व्हिडीओ प्रसारित करत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मदत करावी, असे आवाहन केले आहे. “माझी दोन्ही मुले सौदी अरेबियात बेपत्ता झाली आहेत. माझा सर्व खर्च मुलेच उचलत होती. माझ्या मुलांना शोधण्यात कृपया सहकार्य करा”, अशी विनंती वडिलांनी केली आहे.

अखिल भारतीय शिया पर्सनल लॉ बोर्डने नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. बोर्डाचे सचिव मौलाना अब्बास यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर हा विषय मांडला. दुबई विमानतळावर मोहम्मद शबी नावाच्या आणखी एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये जिथे जिथे भारतीय शिया मुस्लीम नागरिक आहेत, त्यांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

iran israel war are indians in west asia gulf conutries safe
९० लाखांहून अधिक भारतीय इराण-इस्रायल युद्धाच्या विळख्यात; ते सुरक्षित आहेत का? सरकारने नक्की काय म्हटलंय?

भारतीय दूतावासाने काय सांगितले?

दरम्यान, रियाध येथील भारतीय दूतावासाच्या सामुदायिक कल्याण विभागाचे सुमित कुमार यांनी जाफर यांच्या कुटुंबाला ईमेलद्वारे कळवले की, त्यांना सुरक्षेसंबंधित प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.

“मोहम्मद राहिब हसन आणि मोहम्मद जाफर हसन यांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले आहे. दूतावासाने सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असून या प्रकरणाची माहिती मागवली आहे. त्या माहितीची आम्ही वाट पाहत आहोत”, असे या ईमेलमध्ये लिहिले आहे.

मध्य पूर्वेतील देशांमध्ये कडक कायदे

सौदी अरेबिया आणि मध्य पूर्वेतील इतर देशांमध्ये कडक कायदे आहेत. यूएइनेही मार्च महिन्यात इराण युद्धाशी निगडित माहिती फॉरवर्ड केल्याबद्दल ३५ जणांना अटक केली होती. यात १९ भारतीय नागरिकांचा समावेश होता. इराण युद्धावरून दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे यूएइ सरकारचे महाधिवक्ता जनरल हमद सैफ अल शम्स यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले.

सौदी अरेबियाच्या तुरुंगातही अनेक देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांखाली अटकेत आहेत. केरळमधील कोझिकोडमधील रहिवासी अब्दुल रहीम यांनी सौदी अरेबियात २० वर्ष तुरुंगवास भोगला. नुकतीच त्यांची सुटका झाली आणि ते भारतात परतले. एकेकाळी फाशीची शिक्षा झालेल्या रहीम यांना सौदी कायद्यानुसार २० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर क्षमा देण्यात आली. सौदीतील १५ वर्षीय दिव्यांग मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर रहीम त्यात दोषी आढळले होते.

सौदी अरेबियामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेतून सुटका मिळवण्यासाठी ‘ब्लड मनी’ द्यावा लागतो. रहीम यांनी लोकवर्गणीतून ३४ कोटी रुपये जमवून सौदी अरेबिया सरकारला दिले. यानंतरही त्यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागले होते. अखेर २८ मे रोजी ते भारतात परतले.