एपी, कैरोसौदी : सौदी अरेबियामधील तेलाची महत्त्वाची पूर्व-पश्चिम वाहिनी बंद झाली असून, ती पूर्ववत होण्यास काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो, असे स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले आहे. हुती बंडखोरांनी गेल्या आठवड्यात केलेल्या हल्ल्यात या वाहिनीला लक्ष्य केले होते.

सौदी अरेबियातील ही पूर्व-पश्चिम तेलवाहिनी १२०० किलोमीटर असून, तिचे जाळे पूर्ण देशभर पसरले आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक विस्कळित झाल्यानंतर लाल समुद्रामार्गे तेलनिर्यातीचे व्यवस्थापन करण्यामध्ये या तेलवाहिनीने महत्त्वाची भूमिका बजावली. या वाहिनीमधून दररोज ७० लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता आहे. हुती बंडखोरांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सौदी अरेबियामधील ही महत्त्वाची तेलवाहिनी बंद झाली आहे.

सौदी अरेबियामधील महत्त्वाची तेलकंपनी ‘अरामको’कडे या तेलवाहिनीची जबाबदारी आहे.

सौदीवर पुन्हा हल्ले

इराणबरोबर सोमवारी नियोजित चर्चा अरब देशांनी पुढे ढकलली आहे. दरम्यान, येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर नव्याने हल्ले केले असून, जागतिक तेलपुरवठा आणखी विस्कळित होण्याची भीती त्यामुळे निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सनी हल्ला केल्याचे हुती बंडखोरांनी म्हटले आहे. विमाने ठेवण्याची जागा, रडार यंत्रणा, धावपट्टी आणि दारुगोळ्याच्या गोदामांना लक्ष्य करण्यात आले आहे.

तेलाच्या किमतींमध्ये वाढ

क्रूड तेलाच्या किमतींमध्ये सोमवारी तीन टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेत डिझेलच्या किमती प्रतिगॅलन ६.२३ डॉलरवर पोहोचल्या. या किमतीचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. तेलवाहिनी बंद झाल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यामध्ये चार टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

ट्रम्प यांची द्विधा स्थिती

अमेरिका-इराण युद्धाची व्याप्ती येमेनमधील हुती बंडखोर आणि सौदी अरेबियापर्यंत पोहोचल्यामुळे अमेरिकेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. सौदी अरेबियाला मदत करावी, तर युद्धाची व्याप्ती पूर्णपणे नव्या क्षेत्रात वाढण्याचा धोका आहे. अमेरिकेमधील वाढत्या इंधनकिमती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान ट्रम्प यांच्यासमोर आहे.