Saudi Prince Found dead at London Hotel: सौदीच्या २९ वर्षीय प्रिन्स अब्दुल्ला बिन फहद यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ब्रिटनच्या न्यायालयाने केलेली चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अहवालातील माहितीनुसार, राजकुमाराचा मृत्यू आत्महत्या किंवा हत्येचा प्रकार नसून रात्री केलेल्या पार्टीत मद्य, अमली पदार्थ यांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे झाला आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि अमली पदार्थ यांचा शरीरावर एकत्रित परिणाम झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.
चौकशी अहवालानुसार, प्रिन्स अब्दुल्ला १९ नोव्हेंबर रोजी लंडनच्या केंसिंग्टनमधील मॅरियट हॉटेलमध्ये थांबले होते. जवळपास एक आठवडा ते या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी त्यांना हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले गेले. सीसीटीव्हीतही ते बाहेर पडल्याचे दिसले.
दुसऱ्या दिवशी त्यांच्या खोलीत ते बाथरुममध्ये बेशुद्ध पडल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांना दिसून आले. घटनास्थळी तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र प्रिन्स अब्दुल्ला बिन फहद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
मृत्यू कशामुळे झाला?
न्यायालयात सादर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या शरीरात मद्याची मात्रा ही इंग्लंडमधील वाहन चालवण्यासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा तीन पट अधिक होती. याशिवाय त्यांच्या शरीरात जीएचबी नावाचे पार्टी ड्रग, गांजा आणि नैराश्यविरोधी औषधांचे अंश मिळाले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या सर्वांचे शरीरात मिश्रण झाल्यानंतर त्यांना कार्डियक अरेस्ट आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
प्रिन्स अब्दुल्ला व्यसनांच्या विळख्यात
न्यायालयात झालेल्या सुनावणीत असेही समोर आले की, प्रिन्स अब्दुल्ला काही काळापासून व्यसनाधीनतेशी निगडित समस्यांचा सामना करत होते. त्यांना मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन होते. २०२५ साली त्यांना लंडन आणि ब्रिटनमधील नामांकित व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवले गेले होते. उपचारावेळी त्यांनी सहकार्य केल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र उपचारानंतर त्यांनी फॉलोअप अपॉइंटमेंटसाठी हजेरी लावली नाही.
