सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती (यूएई) या तेल पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या दोन अरब राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सौदी अरेबियाने येमेनमधील मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केला आहे. येमेनमध्ये सध्या यूएईच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. येमेनमधील बंडखोरांना शस्त्र व दारूगोळा पुरवण्यासाठी यूएईने एक जहाज मुकल्ला बंदरावर पाठवले, असा संशय सौदी अरेबियाला होता. त्यामुळे सौदी अरेबियाने यूएईने पाठवलेल्या जहाजाला लक्ष्य करण्यासाठी मुकल्ला बंदरावर ‘एअरस्ट्राईक’ केले आहे. त्यानंतर यूएईने आपले सैन्य येमेनमधून माघारी बोलावणार असल्याचे घोषित केले आहे. तेल पुरवठा करणाऱ्या दोन मुस्लिम राष्ट्रांमध्ये यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

सौदी अरेबियाने मंगळवारी यूएईला येमेनमधील सैन्य मागे घेण्यास चोवीस तासांची मुदत दिली होती. त्यानंतर काही तासांतच सौदी अरेबियाकडून मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या हल्ल्यानंतर येमेनमधून सैन्य माघारी घेणार असल्याची घोषणा यूएईने केली आहे. यूएईने शस्त्र व दारूगोळा येमेनमधील फुटीरतावादी संघटनांच्या मदतीसाठी पाठवल्याने सौदी अरेबियाची सुरक्षितता धोक्यात आली होती, सौदीच्या अरेबियाच्या संरक्षणासाठी ‘एअरस्ट्राइक’ केल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. दरम्यान, यूएईने सौदी अरेबियाने केलेला दावा फेटाळला आहे. जहाजातील शस्त्रे ही यूएईच्या सैनिकांसाठी पाठवली होती, असे यूएईने म्हटले आहे.

सौदी अरेबिया – यूएईमधील तणावावर चिंता

सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्ल्याचे आश्चर्य वाटते, असे यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी मार्को रुबियो यांनी सौदी अरेबिया व यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. कुवेत, बहरीन, कतार या देशांनी सौदी अरेबिया व यूएईमधील तणावावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, हवाई हल्ल्यानंतर येमेनमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेली मोहीम संपवत असल्याचे यूएईने घोषित केले आहे. “आमची दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहे”, असे यूएईने म्हटले आहे.

“यूएईची फुटीरतावादी संघटना STC ला मदत”

येमेनमधील फुटीरतावादी संघटना साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलला (STC) यूएई मदत करत आहे, तसेच STC च्या बंडखोरांना सौदी अरेबियाच्या सीमांवर पाठवत आहे. यामुळे सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले होते. सौदी अरेबिया व यूएई या दोन देशांनी मिळून येमेनमधील हुतींच्या विरोधात लढा दिला होता. त्यानंतर सौदी अरेबियाने येमेनमधील सरकारला पाठिंबा दिला, तर यूएईने येमेनच्या दक्षिण भागात असलेल्या फुटीरतावादी संघटना STC ला पाठिंबा दिला. सौदी अरेबियाचा पाठिंबा असलेल्या येमेन सरकारमधील रशद-अल-अलिमी म्हणाले, “यूएई येमेनमधील बंडखोरांना पाठिंबा देत असून त्यांना येमेनमध्ये बंड करण्यासाठी उत्तेजित करत आहे, हे स्पष्ट होते.”