Saying I love you offence says Chhattisgarh High Court: एखाद्या मुलीचा हात पकडून तिला खेचणे आणि ‘आय लव्ह यू’ म्हणणे, हे मुलीचा विनयभंग करण्यासारखे आहे, अशी टिप्पणी छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिली आहे. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने पुढे सांगितले की, कोणत्याही मुलीबरोबर विशेष करून ग्रामीण भागातील मुलीबरोबर असे वागणे चुकीचे आहे.
विनयभंग प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश कुमार चंद्रवंशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. पीडितेचा हात धरत तिला खेचून घेत ‘आय लव्ह यू’ म्हटल्यामुळे आरोपीविरोधात भादंवि आणि पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपीला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
न्यायालयाने आपल्या आदेशात पुढे म्हटले, आरोपीने पीडितेबरोबर केलेले कृत्य हे भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३५४ च्या कक्षेत येते. यामुळे पीडितेचा विनयाला धक्का बसत आहे. आयपीसीच्या कलम ३५४ मध्ये महिलेवर हल्ला करणे किंवा शिक्षेस पात्र असलेल्या बळाचा वापर करून विनयभंग करणे यासाठी शिक्षा सुनावली जाते.
उच्च न्यायालयाने आयपीसीमधील तरतुदींनुसार, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मान्यता दिली. मात्र शिक्षेमध्ये कपात करताना तीन वर्षांवरून एक वर्षांपर्यंत कमी केली. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी १९ वर्षांचा मुलगा होता. त्याने पीडितेचा हात धरून, तिला ओढून ‘आय लव्ह यू’ म्हणण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही आक्षेपार्ह कृत्य केले नव्हते, असेही न्यायालयाने नमूद केले. आरोपी जामिनावर बाहेर असल्याचे लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपीला संबंधित न्यायालयात शरण जाण्याचे आणि शिक्षेचा उर्वरित भाग भोगण्याचे निर्देश दिले.
पोस्कोची शिक्षा हटवली
२०२२ साली सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशात आरोपीला आयपीसी कलम ३५४ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचारासाठी दोषी ठरविले गेले होते. तथापि, उच्च न्यायालयाने आरोपीची पोक्सो कायद्यातील शिक्षेपासून सुटका केली. कारण ज्यादिवशी गुन्हा घडला तेव्हा पीडिता अल्पवयीन होती का? हे सिद्ध होऊ शकलेले नाही.
प्रकरण काय होते?
पीडित मुलगी धाकटी बहीण आणि मैत्रिणीसह शाळेतून घरी परतत असताना आरोपीने तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढत ‘आय लव्ह यू’ म्हटले. या घटनेनंतर हे प्रकरण सुरू झाले. सदर प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली आणि भीतीपोटी ती एका मझारमध्ये जाऊन लपली, असा युक्तिवाद पीडितेच्या बाजूने करण्यात आला. सरकारी वकील प्रभा शर्मा म्हणाल्या, सत्र न्यायालयाने आरोपीला दिलेली शिक्षा तर्कसंगत आणि पुराव्यांच्या आधारावर आहे. त्यामुळे शिक्षा कमी करण्याची आरोपीची याचिका फेटाळण्यात यावी.
तर आरोपीची बाजू मांडणारे वकील पुनीत रूपारेल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नाही.
