Abhishek Manu Singhvi Net Worth : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी नुकतेच आपल्या संपत्ती प्रतिज्ञापत्रातून जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या राज्यसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण २८६०.३६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सिंघवी यांनी त्यांच्या पत्नीसह दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रानुसार, ते निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले आहेत.

सिंघवी यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, गेल्या पाच आर्थिक वर्षांत त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मधील त्यांचे घोषित उत्पन्न ३७४ कोटी रुपये इतके होते, जे आर्थिक वर्ष २०२१ मधील १५८ कोटी रुपयांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांचे एकूण घोषित उत्पन्न १५१६ कोटी रुपयांच्या वर गेले आहे.

सिंघवी यांन जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, ज्यामध्ये आर्टवर्क आणि पेंटिंग्ज यांची किंमत २५ कोटी रुपयांच्या वर आहे. तसेच त्यांनी आपल्यावर कोणतेही कर्ज नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सिंघवी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी पदवी घेतलेली आहे. तसेच ते काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य देखील आहेत.

सिंघवी यांनी स्थावर मालमत्तेबाबत अत्यंत सविस्तर तपशील सादर केला आहे. विशेष बाब म्हणजे सिंघवी यांनी कार्यालय आणि घरातील वस्तूंची यादी देखील प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. तसेच जुन्या संगणकांसारख्या उपकरणांची अवमूल्यन झालेले किंमत देखील नमूद केली आहे.

प्रतिज्ञापत्रात संगणकाची सध्याची किंमत ही फक्त १६३ रुपये देण्यात आली आहे जी २०२४ च्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या ४५४ रुपयांवरून कमी झाल्याचे नमूद केले आहे.

निवडणुकीचा निकाल काय?

अपक्ष उमेदवार कांते सायन्ना (Kante Sayanna) यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्यानंतर , अभिषेक मनु सिंघवी आणि वेम नरेंद्र रेड्डी या दोघांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. रेड्डी यांनी एकूण ४१ कोटी रुपये इतकी आपल्या कुटुंबाची मालमत्ता असल्याचे जाहीर केली आहे, तसेच त्यांच्या नावावर कोणताही गुन्हेगारी खटला नसल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.