सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ११ जुलैपर्यंत वाढ केली. रॉय यांना २०० कोटी रुपये सेबीकडे जमा करायचे आहेत. ही रक्कम जमविण्यासाठी प्रयत्न करता यावेत, यासाठी पॅरोलमध्ये वाढ करण्याची मागणी त्यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली. ही रक्कम जमविण्यासाठी गंभीर प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जर ११ जुलैपर्यंत ही रक्कम जमवता आली नाही, तर पुन्हा पोलिसांपुढे शरण यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.


गेल्या दोन वर्षांपासून तिहार तुरुंगात असलेले सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर जाण्याची मुभा दिली. सुब्रतो रॉय यांच्या मातोश्रींचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे अंत्यसंस्कार आणि उर्वरित विधींसाठी चार आठवड्यांसाठी त्यांना कारागृहातून सोडावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
मार्च २०१४ पासून सुब्रतो रॉय तिहार कारागृहात आहेत. त्यांच्याकडून अनेकवेळा जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आले होते. पण प्रत्येकवेळी न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता. हजारो गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे परत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असतानाही ते परत न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. दहा हजार कोटी रुपये जमा केल्यावर त्यांना जामीन देण्याचे न्यायालयाने निश्चित केले होते. पण तो पैसा उभारण्यात सहारा समूह अपयशी ठरला होता.