विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची झाल्यास पहिल्या टप्प्यात एक मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येईल आणि या दोन्ही परीक्षांचा निकाल १७ ऑगस्टला लावण्यात येईल, असा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवण्यात आला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.


‘नीट’ची सक्ती रद्द करण्याचा २०१३ मध्ये दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काही दिवसांपूर्वीच मागे घेतला होता आणि ‘नीट’ची वैधता नवीन खंडपीठाने तपासण्याचे आदेश दिले आहेत. ‘नीट’चे पुनरुज्जीवन झाल्याने ती केंद्रीय पातळीवर घेतली जाण्याची चिन्हे होती. फक्त ही परीक्षा कोणत्या वर्षीपासून व्हावी, याबाबत मतभेद होते. काही खासगी संस्थाचालकांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. पण त्या सर्व फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पातळीवर नीट ही एकच परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.