गावातील बैलगाड्या शर्यतींमध्ये प्राण्याचा वापर करणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने या स्वरुपाच्या शर्यतींवर आणि प्राण्याच्या साह्याने केल्या जाणाऱया साहसी खेळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच बैलगाड्या शर्यतींवर बंदी घातली आहे. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयातही कायम झाल्याने यापुढे या स्वरुपाच्या शर्यती देशातून हद्दपार होतील. दक्षिण भारतात जल्लीकट्टू महोत्सवात अशाच पद्धतीने बैलांचा वापर केला जात होता. त्यावरही न्यायालयाने बंदी घातली आहे. न्या. के. एस. राधाकृष्णन यांनी हा निकाल दिला. प्राण्यांचा अशा पद्धतीने वापर करणे त्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. प्राणीविरोधी कायद्यानुसार हा गुन्हाच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
काही साहसी खेळांमध्ये बैलांचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्तावही न्यायालयाने फेटाळून लावला. त्याचबरोबर याप्रकरणी तामिळनाडू सरकारने जारी केलेली अधिसूचनाही न्यायालयाने रद्दबातल ठरविली.