नवी दिल्ली : १९७१च्या युद्धात अनेक भारतीय सैनिकांना पाकिस्तानात कैद करण्यात आले असून त्यांच्या सुटकेसाठी दाखल करण्यात याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीस सुरुवात करण्यात आली. न्यायालयाने केंद्राला नोटीस पाठवली असून तीन आठवडय़ांत उत्तर देण्याची मागणी केली  आहे.

१९७१च्या युद्धानंतर पाकिस्तानात युद्धकैदी असलेले मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. मेजर सिंग यांना अवैधरीत्या कैद करण्यात आले असून त्यांच्यासह अन्य सैनिकांची सुटका करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकेची सुनावणी झाली.

या याचिकेत युद्धातील कैद्यांची सुटका करण्याची, तसेच युद्धबंदीच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यंत्रणा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या युद्धकैदींच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावे, असेही या याचिकेत म्हटले आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानने कॅप्टर सौरभ कालिया यांच्यासह चार सैनिकांना पकडून त्यांची हत्या केली होती. या हत्येची चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने प्रयत्न करावे!

मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नी जसबीर कौर यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांत युद्धकैदीच्या मुद्दय़ावर खूप कमी काम झाले आहे. १९७१च्या युद्धानंतर ५४ भारतीय सैनिकांना पाकिस्तानने अवैधरीत्या कैदेत ठेवण्यात आले असून ते हलाखीचे जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे.