आपल्याला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी, अशी याचिका राजीव गांधी हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी केली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे.
आपण केलेल्या दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींनी अद्याप निर्णय घेतला नसल्याने ११ वर्षे विलंब झाल्याचे कारण देत आरोपींनी सदर याचिका केली आहे. संथन, मुरुगन आणि पेरारीवलन या तीन आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. हा खटला अधिकाधिक लांबविण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा संशय जेठमलानी यांनी व्यक्त केला. त्यानंतर केंद्र सरकारने या खटल्याची सुनावणी अन्य दिवशी मुक्रर करण्याबाबत केलेली याचिका सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने फेटाळली.
दयेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विलंब झाल्यास फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आग्रह धरता येऊ शकतो, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका करता येणे शक्य व्हावे यासाठी सरकार अधिकाधिक विलंब करीत असल्याचा संशय जेठमलानी यांनी व्यक्त केला होता.