Supreme Court verdict on regaining Scheduled Caste status : अनुसूचित जाती आणि जमातीतील व्यक्तीने हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा स्वीकार केला, तर त्या संबंधित व्यक्तीला अनुसूचित जाती (SC) समुदायाचा सदस्य मानले जाऊ नये, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्यायालयाने निष्कर्ष काढला की, हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केल्यास जन्माचा विचार न करता, धर्मांतराच्या क्षणापासून अनुसूचित जातीचा दर्जा त्वरित आणि पूर्णपणे संपुष्टात येईल. तसेच, ज्यांना पुन्हा मूळ धर्मात यायचे असेल, त्यांच्यासाठीही न्यायालयाने काही अटीही स्पष्ट केल्या आहेत. लाइव्ह लॉ या कायदेशीर वृत्त देणाऱ्या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने ‘संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५०’मधील ‘कलम ३’चा आधार घेतला. हे कलम सांगते, “हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या धर्माचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती अनुसूचित जातीचा सदस्य मानली जाणार नाही.” १९५६ मध्ये शीख धर्माचा आणि १९९० मध्ये बौद्ध धर्माचा या कलमात समावेश करण्यासाठी सुधारणा करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?

चिंताडा आनंद यांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. आनंद यांचा जन्म हिंदू-मादिगा (अनुसूचित जाती) कुटुंबात झाला होता; परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ते पास्टर (धर्मोपदेशक) बनले. मात्र, तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने हल्ले होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्या दाव्याच्या आधारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अंतर्गत तक्रार दाखल करीत त्यांनी संरक्षण मिळावे, अशी मागणी केली.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणातील फौजदारी कारवाई रद्द केली होती. न्यायालयाने म्हटले होते की, आनंद हे ख्रिश्चन धर्माचे पालन करीत असून, दशकापासून ते पास्टर असल्याने ते १९८९ च्या कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाहीत. ख्रिश्चन धर्मात जातिव्यवस्था मान्य नसल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले होते.

‘प्रोफेस’ (धर्म पाळणे/जाहीर करणे) या शब्दाचा अर्थ

उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने १९५० च्या आदेशातील ‘प्रोफेस’ (Profess) या शब्दाकडे लक्ष वेधले. न्यायमूर्ती मिश्रा यांनी नमूद केले, “या शब्दाचा अर्थ आपला धर्म सार्वजनिकपणे जाहीर करणे किंवा त्याचे आचरण करणे, असा होतो. ही केवळ वैयक्तिक श्रद्धा नसून, आपल्या विश्वासाचे बाह्य प्रकटीकरण आहे. ख्रिश्चन धर्म आपल्या तात्त्विक पायानुसार जातिव्यवस्थेला मान्यता देत नाही.”

न्यायालयाने स्पष्ट केले की, जी धर्मांतरित व्यक्ती कलम ३ मधील तीन धर्मांशिवाय (हिंदू, बौद्ध, शीख) इतर धर्माचे पालन करते, ती अनुसूचित जातीचा कोणताही वैधानिक लाभ, संरक्षण, आरक्षण किंवा अधिकाराचा दावा करू शकत नाही.

पुनर्धर्मांतरासाठी कडक अटी

जर एखाद्या व्यक्तीला पुन्हा हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मात ‘पुनर्धर्मांतरित’ झाल्याचा दावा करायचा असेल, तर त्या व्यक्तीला खालील गोष्टी सिद्ध कराव्या लागतील :

१. त्याच्या मूळ जातीचा स्पष्ट पुरावा.
२. मूळ धर्मात पुन्हा परतल्याचा विश्वासार्ह पुरावा.
३. मूळ जातीच्या सदस्यांनी त्याला पुन्हा समुदायात स्वीकारले आणि सामावून घेतले असल्याचा समाधानकारक पुरावा.