Lawyers Detained at SC : एसआयआर प्रक्रियेत गैरकारभार झाल्याचं समोर येताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली. आज दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले असून ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. तसंच, अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एवढंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात निदर्शने करणाऱ्या वकिलांवरही पोलिसांनी कारवाई केली असून अतिरेकी बळाचा वापर करून त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचा दावा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने केला. त्यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पत्र लिहिलं.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (SCBA) शनिवारी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या वकिलांवर, विशेषतः महिला वकिलांवर, अतिरेकी बळाचा वापर करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा असोसिएशनने केला आहे.

SCBA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सरन्यायाधीशांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे हा विषय मांडण्याची विनंती करण्याचा ठराव केला आहे, जेणेकरून ताब्यात घेतलेल्या प्रत्येक वकिलाचा ठावठिकाणा आणि सुरक्षा निश्चित करता येईल, त्यांना कायदेशीर मदत मिळवता येईल आणि ज्यांच्याविरुद्ध अटकेचे कोणतेही कायदेशीर कारण नाही अशांची त्वरित सुटका केली जाईल.”

असोसिएशनने सांगितलं की, त्यांना अनेक वकिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ताब्यात घेतलेल्या प्रत्येक वकिलाचा ठावठिकाणा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरन्यायाधीशांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. याशिवाय, ताब्यात घेतलेल्या वकिलांना कायदेशीर मदत मिळवून देणं आणि कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय ताब्यात घेतलेल्यांची त्वरित सुटका करणं, अशी विनंतीही असोसिएशनने सरन्यायाधीशांना केली आहे.

वकिलांना सोडा, सरन्यायाधीशांचे आदेश

दरम्यान, लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, अटकेत असलेल्या वकिलांना सोडण्याबाबत सरन्यायाधीशांनी अधिकाऱ्यांना कळवलं आहे.