उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील दौदापूर शासकीय प्राथमिक शाळेतील अनुसूचित जातीतील मुलांची मध्यान्य भोजनासाठी वापरलेली भांडी वेगळी ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवनिर्वाचित सरपंच मंजू देवी यांच्या पतीने शाळेत जातीय भेदभावाची तक्रार केली होती. या शाळेतील ८०  पैकी साठ मुलं अनुसूचित जातीतील आहेत. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी बेवार ब्लॉकमधील या शाळेला भेट दिली असून मुख्याध्यापिका गरिम राजपूत यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी वापरलेल्या भांड्यांना स्पर्श करू शकत नाही, असे म्हटल्यानंतर दोन स्वयंपाकींना कामावरून काढण्यात आले. दरम्यान, शाळेत जातीय भेदभाव होत असल्याची तक्रार खरी असल्याचं मैनपुरीचे मूलभूत शिक्षण अधिकारी कमल सिंह यांनी सांगितले.

मैनपुरीचे मूलभूत शिक्षण अधिकारी कमल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला बुधवारी यासंदर्भात तक्रार मिळाली आणि तपासणीसाठी एक टीम शाळेत पाठवण्यात आली. अनुसूचित जातीच्या मुलांनी आणि इतर मुलांनी वापरलेली भांडी वेगळी ठेवली होती. गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. भेटीदरम्यान, स्वयंपाकी सोमवती आणि लक्ष्मी देवी यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या भांडीला स्पर्श करण्यास नकार दिला आणि सांगितले की जर त्यांना सक्ती केली गेली तर त्या शाळेत काम करू शकणार नाहीत. त्यांनी जातीवाचक अपशब्दांचाही वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर शाळा व्यवस्थापन समितीने कारवाई केली आहे.”

सरपंच मंजू देवी यांचे पती साहब सिंह म्हणाले की, १५ सप्टेंबर रोजी शाळेत भेदभाव मुलांसोबत भेदभाव होत असल्याचं काही पालकांनी त्यांना सांगितलं. “१८ सप्टेंबर रोजी मी शाळेत बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी यासंदर्भात पाहणी केली असता स्वयंपाकघर अतिशय घाणेरडे होते आणि १०-१५ प्लेट्स वेगळ्या ठेवल्या होत्या. मी इतर थाळ्या कुठे आहेत, असं स्वयंपाकीला विचारले असता त्यांनी सांगितले कि स्वयंपाकघरातील प्लेट्स मागासवर्गीय आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या आहेत. तर ५०-६० थाळ्या वेगळ्या ठेवल्या आहेत. तसेच अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना स्वतःचे भांडे धुण्यास आणि ठेवण्यास भाग पाडण्यात आले. कारण इतर जातींमधील कोणीही त्यांना स्पर्श करण्यास तयार नव्हते,” असे साहब सिंह म्हणाले. साहब सिंह यांनी तक्रार केल्यानंतर स्थानिक पत्रकार आणि अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती माहिती दिली.

गावातील सुमारे ३५% लोकसंख्या दलित असून ठाकूरांची संख्या देखील तेवढी आहे, तर बाकीचे लोक मागासवर्गीय आहेत, साहब सिंह म्हणाले. दरम्यान, मैनपुरी हा समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचा बालेकिल्ला आहे.