धक्कादायक – शाळेला अद्दल घडवण्यासाठी केली सह-विद्यार्थ्याची हत्या

शिक्षकांनी ओरडल्याचा राग मनात ठेवत केवळ शाळेची बदनामी व्हावी व शाळा बंद पडावी यासाठी या मुलानं दुसऱ्या मुलाचा खून केला

प्रतिकात्मक छायाचित्र

बडोद्यातील भारती विद्यालयामधील १६ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने १४ वर्षांच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. शिक्षकांनी ओरडल्याचा राग मनात ठेवत केवळ शाळेची बदनामी व्हावी व शाळा बंद पडावी यासाठी या मुलानं दुसऱ्या मुलाचा खून केला. शाळेच्या बाथरूममध्ये त्यानं हा लांच्छनाास्पद प्रकार केला आहे.

शुक्रवारी ही घटना घडली असून त्या मुलानं पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे. गृहपाठ केला नाही म्हणून या मुलाला शिक्षकांनी झापलं होतं. दोन दिवस त्याच्या मनात त्याचा राग होता. शाळेला काहीतरी अद्दल घडवावी असं सतत त्याच्या डोक्यात होतं. त्याचभरात जर शाळेत एखाद्या विद्यार्थ्याची हत्या झाली तर शाळाच बंद पडेल असा विचार करून त्यानं ही हत्या केली.

अत्यंत नियजनपूर्वक ही हत्या घडवल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, दुसऱ्या दोन मुलांनी त्याला बाथरूममध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याचा जीव घेताना बघितल्यामुळे हा अल्पवयीन गुन्हेगार अडकल्याचे पोलिसांनी सांगितले. अंगावर रक्ताचे डाग उडू नयेत म्हणून त्यानं चाकूने हल्ला करण्यापूर्वी स्वत:चा शर्टदेखील काढला होता. त्या मुलावर चाकुने हल्ला केल्यानंतर हा मुलगा तिथून पळून गेला व मावशीच्या घरी जाऊन त्यानं कपडे बदलले.

ज्यावेळी त्याच्या वडिलांना शाळेतली घटना समजली त्यावेळी त्यांनी मुलाला मावशीच्या घरातून ताब्यात घेतलं व ते वलसाडला गेले. मात्र, दरम्यान ज्या दोन मुलांनी गुन्हा घडताना बघितलं होतं, त्यांनी पोलिसांना हत्या करणाऱ्या मुलाची ओळख सांगितली होती. त्यामुळे वलसाड पोलिसांच्या मदतीनं त्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं. मुलानं हत्येची कबुली दिली असून त्या दुर्देवी मुलावर चाकचे अनेक वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शिक्षिका ओरडली म्हणून शाळेला बदनाम करण्याच्या अट्टाहासापायी एका निष्पाप विद्यार्थ्यानं मात्र हकनाक जीव गमावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Schhol boy kills another student to teach lesson to school