जम्मू काश्मीर सरकारने शालेय ग्रंथालयांमधून दोन पुस्तकं मागे घेतली आहेत. कारण या पुस्तकांमध्ये फुटीरतावाद्यांबाबत जो उल्लेख करण्यात आला आहे तो मजकूर योग्य नाही. या पुस्तकांमध्ये फुटीरतावाद्यांचं उदात्तीकरण करण्यात आलं आहे. या प्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी संबंधित पुस्तकांच्या प्रकाशकांच्या विरोधात युएपीएच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने या प्रकाशाच्या कार्यालयावर छापे मारुन झडतीही घेतली.

जम्मू काश्मीरच्या शिक्षण मंत्री काय म्हणाल्या?

जम्मू काश्मीच्या शिक्षण मंत्री सकिना इत्तू यांनी घडलेला प्रकार हा दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा सगळा प्रकार एका अर्थाने रचला गेलेला कट आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारची पुस्तकं ज्यांनी शाळांच्या ग्रंथालयांना पुरवली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही सकीना यांनी स्पष्ट केलं. सदर प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना निलंबित केलं जाईल आणि त्यांच्याविरोधात चौकशी समिती नेमली जाईल असंही सकीना यांनी म्हटलं आहे. शिक्षण मंत्र्यांच्या या आदेशानंतर शाळा प्रशासनाने आठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

दोन पुस्तकांचं प्रकाशन दिल्ली येथील प्रकाशकाकडून

Personalities and Legends of J&K हे पुस्तक हिलाल अहमद आणि संतोष मीना यांनी लिहिलं आहे तर Great Personalities of Jammu and Kashmir हे पुस्तक सुशांत गिरी यांचं आहे ही दोन्ही पुस्तकं जम्मूच्या ओबेरॉय बुक सर्विस आणि अनुराग प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहेत. तसंच ही पुस्तकं त्यांनी सदर शाळांमधील ग्रंथालयाना पाठवली आहेत. समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत ही पुस्तकं पाठवल्याचं समजतं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.