scorecardresearch

कर्नाटकातील शाळा पुन्हा सुरू; संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचा आदेश

मुस्लीम मुली हिजाब घालून शाळेत पोहोचल्या आणि वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी ते काढून ठेवले. सोमवारच्या नियोजित परीक्षाही ठरल्यानुसार पार पडल्या.

संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचा आदेश

हिजाबवरून उद्भवलेल्या वादामुळे सुमारे आठवडाभर बंद राहिलेल्या कर्नाटकमधील शाळा सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. गेल्या आठवडय़ात हिंसाचार व तणावाला सामोरे गेलेल्या उडुपीसह दक्षिण कन्नड व बंगळूरु येथील संवेदनशील भागांत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. या जिल्ह्यांतील संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

 उडुपी जिल्ह्यात सुरू झालेल्या सर्व शाळांमध्ये सामान्य उपस्थिती होती, असे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. मुस्लीम मुली हिजाब घालून शाळेत पोहोचल्या आणि वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी ते काढून ठेवले. सोमवारच्या नियोजित परीक्षाही ठरल्यानुसार पार पडल्या.

 शांतता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून शनिवापर्यंत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या २०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू केले आहे. कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी उडुपी शहरांत तसेच शाळांजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

 वर्गात जाण्यापूर्वी हिजाब काढून ठेवून मुस्लीम मुली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहेत, असे उडुपीचे तहसीलदार प्रदीप कुरुडेकर यांनी काही शाळांना भेट दिल्यानंतर सांगितले. हिंदू विद्यार्थी भगवे शेले घालून आल्याचे प्रकार कुठेही घडले नाहीत.

 दरम्यान, उडुपी पेजावर मठाचे प्रमुख स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ यांनी समाजातील सर्व घटकांना गोंधळ टाळण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

 कोप्पल व कलबुर्गी जिल्ह्यांतील काही सरकारी शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थिनी वर्गात हिजाब व बुरखा घालून आल्याचे दिसल्याचे शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले. नंतर त्या ठिकाणी पोहोचललेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे काढून टाकण्यास सांगितले.

 राज्यात शांतता कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शाळा उघडण्याच्या एक दिवस आधी, रविवारी व्यक्त केला होता.

 हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर, उच्चशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील महाविद्यालये यांना जाहीर करण्यात आलेली सुट्टी १६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आल्याचे सरकारने शुक्रवारी सांगितले होते.

 हिजाबसंबंधित सर्व याचिकांवर निर्णय प्रलंबित असताना, कर्नाटक उच्च न्यायालयाने  अंतरिम आदेशात  शैक्षणिक संस्था सुरू करण्याची विनंती करतानाच, विद्यार्थ्यांना वर्गात कुठल्याही प्रकारचा धार्मिक पेहराव करण्यास प्रतिबंध केला होता.

शिवमोगा येथे शिक्षक-विद्यार्थी वाद

 उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हिजाब किंवा बुरखा घालून शाळेच्या परिसरात प्रवेश करू नये अशी सूचना शाळेच्या अधिकाऱ्यांनी करूनही आपल्याला बुरखा घालून शाळेच्या आत जाऊ द्यावे, असा आग्रह शिवमोगा येथे काही विद्यार्थिनींनी धरला. मुलींनी आपल्याला न्यायालयाच्या आदेशाची कल्पना नसल्याचे सांगितले, मात्र त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School resumes in karnataka order of curfew in sensitive areas akp

ताज्या बातम्या