जवळपास पाच दशकांनंतर बालपणीचे दिवस पुन्हा जगण्याची इच्छा मनात बाळगून, १९७६ च्या बॅचमधील काही जिवलग मित्र पुन्हा एकदा आपल्या जुन्या शाळेत पोहोचले. विशेष म्हणजे, यावेळी ते माजी विद्यार्थी म्हणून नव्हे, तर अगदी शाळकरी मुलांच्या वेशभूषेत शाळेत आले होते. पाठीवर शालेय दप्तर, गळ्यात रंगीबेरंगी पाण्याच्या बाटल्या आणि अंगावर हुबेहूब शाळेच्या गणवेशासारखे कपडे असा त्यांचा हा अनोखा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. इन्स्टाग्राम यूजर राकेश नगर यांनी या खास भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांना त्यांच्या शाळेच्या दिवसांची आठवण करून दिली.

पाठीवर दप्तर, गळ्यात पाण्याची बाटली

१९७६ च्या बॅचमधील हे मित्र ‘फॉर्मल शर्ट’ आणि पँट घालून जुन्या शाळेत पोहोचले. त्यांच्या पोशाखासोबत पाठीवर दप्तर आणि गळ्यात मुलांच्या वापरातील रंगीबेरंगी पाण्याच्या बाटल्या होत्या. पन्नास वर्षांपूर्वी ज्या वयात ते रोज शाळेत यायचे, त्याच दिवसांची आठवण करून देणारा हा लूक होता. फरक एवढाच की, यावेळी शाळेच्या गेटमधून प्रवेश करणारे तेच विद्यार्थी आता आयुष्याच्या अनेक दशकांचा अनुभव घेऊन परतले होते.

शाळेच्या गेटमधून आत जाताच जुन्या आठवणी ताज्या

शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करताच मित्रांच्या चेहऱ्यावरचा उत्साह स्पष्ट दिसत होता. एकमेकांना पाहून ते हसत होते, गप्पा मारत होते आणि जुन्या आठवणींमध्ये रमले होते. ज्या वर्गखोल्या, मैदान आणि परिसरात त्यांचे बालपण गेले होते, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

केवळ एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देण्यापुरतीच ही भेट मर्यादित राहिली नाही, तर या मित्रांनी आपल्या बालपणीचे खेळही पुन्हा एकदा खेळले. एका क्षणी सर्वजण मनसोक्त पिठ्ठू खेळताना दिसले, तर त्यानंतर त्यांनी शाळेच्या मैदानाशी जोडलेला ‘ट्रेन डान्स’ही केला. सगळे एकामागोमाग एक उभे राहून नाचत होते आणि मिळालेल्या त्या अपूर्व क्षणांचा ते मनमुराद आनंद घेत होते.

‘गोल्डन मेमरीज’ पुन्हा जगण्याचा निर्णय

या भेटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, बालपणीच्या त्या ‘गोल्डन मेमरीज’ पुन्हा जगता येतील का, असा विचार ते अनेकदा करायचे. अखेर त्यांनी तो विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला.

“ज्या शाळेत आम्ही हसलो, खेळलो आणि एकमेकांशी मैत्री केली, त्याच शाळेत आम्ही पुन्हा एकत्र पोहोचलो,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी या व्हिडिओला “१९७६ च्या बॅचमधील माझे बालपणीचे मित्र” असे कॅप्शन दिले.

व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक

जुन्या मित्रांच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने अजूनही आपल्या शाळेतील मित्रांना भेटता आले नसल्याचे सांगितले. तर दुसऱ्याने हा व्हिडिओ पाहून आनंद झाल्याचे म्हटले. काहींनी या मित्रांना अशाच पद्धतीने आयुष्याचा आनंद घेत राहण्याच्या शुभेच्छाही दिल्या.