कसरगोड, केरळ : उत्तर केरळ जिल्ह्यातील कल्लार येथे एक शिक्षिका मोबाइलवर वर्ग घेत असताना प्रत्यक्ष विद्यार्थी दिसावेत अशी इच्छा व्यक्त करीत ती जागीच कोसळली आणि गतप्राण झाली.

अदोकुट्टया येथे ही घटना घडली असून माधवी सी. ही शिक्षिका प्राथमिक शाळेचे ऑनलाइन वर्ग घेत होती. तिसऱ्या इयत्तेचा गणिताचा वर्ग तिने घेतला होता. मोबाइल फोनवरून हा वर्ग घेण्यात आला. पण तिला मुलांना प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती आणि  तिने तसे बोलूनही दाखवले होते.

ऑनलाइन वर्ग सुरू असतानाच  ही शिक्षिका अस्वस्थ झाली होती. अचानक तिला श्वासात अडथळे आले. खोकला सुरू झाला.  शाळा पुढील आठवडय़ात सुरू करायला पाहिजेत असे ती म्हणत होती.

या शिक्षिकेने सर्व मुलांना बघण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर तिने अचानक वर्गात ऑनलाइन शिकवणे थांबवले. तिने मुलांना गृहपाठ दिला.

यानंतर काही काळाने नातेवाईक घरी आले तेव्हा ही शिक्षिका बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचे दिसून आले. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, अतिरक्तदाबामुळे तिचा अचानक मृत्यू झाला असावा.