Video : हृदयद्रावक…वडिलांच्या डोळ्यांसमोर स्कूल बसने चिमुकल्याला चिरडलं

चार दिवसानंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय

(व्हिडीओचा स्क्रिनशॉट)
स्कूल बस चालकाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे वडिलांच्यासमोरच त्यांच्या चिमुरड्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या रोहनिया परिसरातील ही घटना आहे. घटनेच्या चार दिवसानंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

शनिवारी २४ नोव्हेंबर रोजी रोहनिया क्षेत्रातील राजा तालाब बीरभानपूर गावात ही घटना घडली. चिमुकला साजिद हा सनराईज स्कूलमध्ये शिकत होता. तो स्कूल बसमधून आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर उतरला होता, आणि त्याच स्कूल बसखाली चिरडून त्याचा मृत्यू झालाय. स्कूल बसमधून उतरुन साजिद घराच्या दिशेने धावला, त्याचवेळी ड्रायव्हर अवधेश पटेल याने बस सुरू केली आणि ती बस साजिदला चिरडून पुढे गेली. धक्कादायक म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी साजिदचे वडील घराच्या छतावर उभे होते. ‘ड्रायव्हरने बस सुरू केल्याचं पाहताच मी जोरजोरात ओरडलो. पण माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. कारण, त्यावेळी ड्रायव्हरने ईअर फोन घातले होते’, असा आरोप वडिलांनी केला आहे.

या घटनेमुळे चिमुकल्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेनंतर चिमुकल्याच्या कुटुंबियांनी शाळा प्रशासन आणि ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून ड्रायव्हर फरार आहे. संबंधित स्कूल बस देखील ताब्यात घेण्यात आली आहे, तर फरार ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाहा व्हिडीओ – (सौजन्य – न्यूज 18)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: School van run over the child incident of varanasi