भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही वैज्ञानिकांनी ज्याला बाह्य़ हार्डवेअर लागणार नाही असे कॉकलिअर यंत्र (कॉकलिअर इम्प्लांट) तयार केले आहे. कर्णबधिरांसाठी ते वरदान ठरणार असून कमी शक्तीच्या संदेशांची प्रक्रिया करणारी चिप वापरून ते विकसित केले आहे. विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक अनंत चंद्रशेखरन, जोसेफ एफ, नॅन्सी पी कीथले यांनी हे नवीन कॉकलिअर इम्प्लांट तयार केले आहे.
कॉकलिअर इम्प्लांट हे असे वैद्यकीय यंत्र असते ज्यात विद्युत लहरींच्या मदतीने श्रवण चेतापेशींना उद्दिपीत केले जाते. जगात जे बहिरे लोक आहेत त्यांना कॉकलियरमुळे मोठा फायदा झाला आहे, हे खरे असले तरी त्यात काही बदल आवश्यक होते.
आताच्या नवीन यंत्रात चकतीसारखा ट्रान्समीटर असतो व त्याचा व्यास काही इंच असतो, तो कवटीला लावावा लागतो. त्यात एक वायर मायक्रोफोन व पॉवर सोर्स यांना जोडली जाते. रूग्णाच्या कानाशी लावलेले हे यंत्र मोठय़ा आकाराचे असल्याने ते चांगलेही दिसत नाही. मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीत वैज्ञानिकांनी हार्वर्ड मेडिकल स्कूल व मॅसॅच्युसेट्स आय अँड इयर इनफर्मरी या संस्थेच्या वैज्ञानिकांच्या मदतीने नवीन चिप तयार केली असून ते कॉकलिअर इम्प्लांट यंत्रच असून ते बिनतारी पद्धतीने चार्ज करता येते.
 ते एका चार्जिगला आठ तास चालते.  इंटरनॅशनल सॉलिड स्टेट सर्किट कॉन्फरन्स या परिषदेत याबाबतचा शोधनिबंध सादर केला जाणार आहे. साध्या सेलफोनच्या चार्जरनेही ही सिंगल प्रोसेसिंग चिप दोन मिनिटात चार्ज होते. सध्याचे कॉकलिअर इम्प्लांट हे बाह्य़ मायक्रोफोनच्या मदतीने आवाज गोळा करतात, पण नवीन इम्प्लांटमध्ये मध्यकर्णाचा वापर नैसर्गिक मायक्रोफोनसारखा केला जातो, जो कॉकलिअर इम्प्लांट आवश्यक असलेल्या रूग्णात व्यवस्थित असतो.  मध्यकर्णात अतिशय नाजूक अशी ऑसिकल्स नावाची हाडे असतात. ती ध्वनीलहरींची कानाच्या पडद्यातील स्पंदने कॉकलिया या आंतरकर्णातील भागात वाहून नेतात व तेथे ध्वनी संदेशाचे विद्युत संदेशात रूपांतर होते.
ज्या लोकांमध्ये मध्यकर्ण इम्प्लांट असते त्यांचा कॉकलिआ काम करीत असतो. पण ऑसिकल्स नावाची हाडे स्पंदित होत नाहीत त्यामुळे त्यांच्यापासूनचे संदेश श्रवणचेतेला उद्दिपित करू शकत नाहीत. मध्यकर्ण इम्प्लांटमध्ये बारीक संवेदक असतो तो ऑसिकलची स्पंदने टिपतो व पुढे पाठवतो. नवीन यंत्रात हाच संवेदक वापरला असून यात जो संदेश निर्माण होतो तो कानात लावलेल्या मायक्रोचिपमधून जातो व त्याचे ध्वनिलहरीतून विद्युत संदेशात रूपांतर होते व नंतर त्या लहरील कॉकलियाच्या इलेक्ट्रोडकडे जातात.