पीटीआय, इस्लामाबाद
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांदरम्यान प्रादेशिक जोडणी, व्यापार आणि वाहतूक या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती भारताचे ‘एससीओ’चे राष्ट्रीय समन्वयक आलोक ए दिमरी यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथे पुढील महिन्यात ‘एससीओ’च्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. तर पुढील वर्षी पाकिस्तानात ‘एससीओ’ची शिखर परिषद होणार आहे. त्याच्या तयारीसाठी सदस्या देशांच्या राष्ट्रीय समन्वयकांची तीन दिवसांची बैठक इस्लामाबादमध्ये पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, २० नोव्हेंबरला ‘एससीओ’च्या ‘सिव्हिलायझेशन डायलॉग फोरम’ची बैठक होत आहे. त्याला उपस्थित राहण्याचे सदस्य देशांनी मान्य केल्याचे दिमरी यांनी ‘पीटीव्ही न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘एससीओ’चे चीन, भारत, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारुस हे १० सदस्य देश आहेत. सदस्य देशांचे आपापसातील राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य यावर ही संघटना विशेष भर देते.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या मुलाखतीनुसार, दिमरी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘एससीओ’ने युरेशिया आणि आशियामधील देशांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आमचे स्वास्थ्य, समृद्धी आणि कल्याण या मुद्द्यांवर आम्ही आमचा अजेंडा आखला आहे. “संपर्क हा महत्त्वाचा विषय आहे. प्रादेशिक जोडणी, व्यापार, वाहतूक हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यावर आम्ही चर्चा केली आणि त्यामध्ये प्रगतीही झाली,” असे दिमरी यांनी ‘पीटीव्ही’ला सांगितले. गेल्या वर्षीचा पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानात झालेल्या लष्करी संघर्षानंतर भारताच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींनी पाकिस्तानचा केलेला हा पहिला दौरा आहे.
