एक्स्प्रेस वृत्त

मुंबई : चोखंदळ चित्रपट रसिकांच्या पसंतीच्या ‘चेतक स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्यात यंदा कोणते कलाकार बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मोठा पडदा तसेच ओटीटीवर प्रदर्शित झालेले चित्रपट पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आले आहेत. गतवर्षी बॉक्स ऑफिस गाजवलेला आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’, तरुणांच्या पसंतीला उतरलेली व मोहित सुरीने दिग्दर्शन केलेली प्रेमकहाणी ‘सैयारा’ आणि नीरज घायवानचा ‘होमबाउंड’ या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.

एकूण ३१ श्रेणींमधून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलाकारांना सन्मानित केले जाईल. दिग्दर्शन, अभिनय, लेखन, गायन, संगीत या लोकप्रिय श्रेणींबरोबरच चित्रपटांना आकार व अर्थ देणाऱ्या आणि अनेकदा पडद्याआड राहणाऱ्या तंत्रज्ञांसाठीही विविध श्रेणींचे पुरस्कार आहेत. धुरंधरला सर्वाधिक म्हणजे २४ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. त्यापाठोपाठ सैयाराला १७ आणि होमबाउंडला १५ नामांकने आहेत. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या मिसेस, रात अकेली है, द बन्सल मर्डर्स, स्टोलन, द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली आणि मेहता बॉइज याही चित्रपटांचा पुरस्कारांसाठी विचार करण्यात आला आहे.

Award Banner

या सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय आयुषी व्होरा, आदिती अग्रवाल, आलिशा हजल, अनिता बोकेपल्ली, अंजू मोर, चेतन मोंगा, कनक कथुरिया, मोहिनी वार्षणेय, साक्षी शेट्टी आणि शनाया यासारखे यूट्यूबवरील आघाडीचे क्रिएटरही पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असतील. विजेत्यांची निवड करण्याची जबाबदारी ‘स्क्रीन ॲकॅडमी’वर सोपवण्यात आली आहे. या अभिनेत्री आलिया भट पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाचा चेहरा असेल. तिच्याबरोबर अभिनेता-हास्य कलाकार सुनील ग्रोव्हर, स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान आणि, द इंडियन एक्स्प्रेस हिंदीचे संपादक सौरभ द्विवेदी हेही सूत्रसंचालन करणार आहेत. खुमासदार आणि माहितीपूर्ण सूत्रसंचालनाच्या जोडीला संगीत आणि नृत्यांचीही रेलचेल असेल.

उत्कृष्ट चित्रपटासाठी धुरंधर, लक्ष्मण उतेकरचा छावा, शाझिया इक्बालचा धडक २, सुपर्ण वर्माचा हक, आर एस प्रसन्नचा सितारे जमीन पर, रीमा कागतीचा सुपरबॉइज ऑफ मालेगाव, सैयारा आणि होमबाउंड यांच्यात स्पर्धा आहे.

स्क्रीन ॲकॅडमीचे सदस्य

लेखिका, दिग्दर्शिका आणि संकलक रीमा दास, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अभिषेक चौबे, ध्वनी रचनाकार विश्वदीप चॅटर्जी, चित्रपट संकलक आणि दिग्दर्शिका दीपा भाटिया, पटकथा लेखक आणि गीतकार जयदीप साहनी, अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहम, दिग्दर्शक कबीर खान, दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, गीतकार आणि पटकथा लेखिका कौसर मुनीर, दिग्दर्शिका पायल कपाडिया, संकलक आणि पटकथा लेखिका पूजा लाढा सुरती, अभिनेत्री विद्या बालन, अभिनेता, दिग्दर्शक आणि नाट्य संशोधक विनय कुमार.