2026 Scripps National Spelling Bee Winner: अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी २०२६’ स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांनी पुन्हा एकदा आपल्या अफाट बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. अमेरिकेतल्या या स्पर्धेत जिंकणारा नी हरणारा दोन्ही भारतीय वंशाची मुलं आहेत. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या १४ वर्षीय श्रेय परीख याने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ऐतिहासिक ‘स्पेल-ऑफ’ (Spell-Off) फेरीत नवा विक्रम रचत या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. ९० सेकंदांच्या थरारक वेळेत तब्बल ३२ शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगत श्रेयने ‘स्क्रिप्स कप’ आणि ५०,००० डॉलर्स (सुमारे ४१ लाख रुपये) रकमेचे भव्य बक्षीस पटकावले आहे.
९० सेकंदांचा तो थरार आणि ऐतिहासिक ‘स्पेल-ऑफ’
गुरुवारी रात्री झालेल्या या स्पर्धेत तब्बल ९ फेऱ्यांनंतरही मुख्य स्पर्धा अनिर्णित राहिली. अंतिम फेरीत आठवीत शिकणारा कॅलिफोर्नियाचा श्रेय परीख आणि न्यू जर्सीचा सातवीतील इशान गुप्ता (वय १२) यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोघेही मागे हटायला तयार नसल्याने अखेर परीक्षकांनी ‘स्पेल-ऑफ’ म्हणजेच वेळेच्या मर्यादेत जास्तीत जास्त अचूक शब्द सांगण्याची स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला.
विजेतेपदाची विभागणी टाळण्यासाठी २०२१ मध्ये हा नियम आणला गेला होता. या फेरीत स्पर्धकाला स्टेजवर येऊन ९० सेकंदांत जास्तीत जास्त शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगावे लागते, तर दुसऱ्या स्पर्धकाला हेडफोन लावून वेगळ्या खोलीत बसवले जाते जेणेकरून त्याला शब्द ऐकू जाणार नाहीत.
श्रेयने या फेरीत पहिल्यांदा जात शांतपणे दीर्घ श्वास घेतला आणि ‘melengket’ (मेलेंगकेत) आणि ‘rapakivi’ (रापाकिवी) सारख्या अत्यंत कठीण शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगत एकूण ३५ शब्दांपैकी ३२ शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगितले. स्पेलिंग बी स्पर्धेच्या इतिहासातील हा एक नवा विक्रम ठरला आहे. इशान गुप्ताने २५ शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगत चांगली झुंज दिली, पण श्रेयच्या वेगापुढे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आठवीत असलेल्या श्रेयसाठी या स्पर्धेत उतरण्याचे हे शेवटचे वर्ष होते.
तिसरी फेरी ठरली ‘क्रूर’; दिग्गज स्पर्धक बाद
स्पर्धेची तिसरी फेरी अत्यंत कठीण आणि धक्कादायक ठरली. या एकाच फेरीत चार कसलेल्या स्पर्धकांचे आव्हान संपुष्टात आले आणि अंतिम शर्यतीत फक्त ५ स्पर्धक शिल्लक राहिले. यामध्ये खालील दिग्गज स्पर्धकांना बाहेर पडावे लागले:
- एडन मेंग: कॅलिफोर्नियाचा हा सातवीतील विद्यार्थी ‘catometope’ (खेकड्याची एक प्रजाती) या शब्दाचे स्पेलिंग चुकल्यामुळे बाद झाला.
- ऑलिव्हर हॅल्केट: लॉस एंजेलिसच्या या १४ वर्षीय मुलाला ‘Faesulae’ (इटलीतील एक प्राचीन शहर) या शब्दाने अडचणीत आणले.
- अविष्का दुदाला: १३ वर्षीय अविष्का इंग्रजीतील ‘Schwa’ (अस्पष्ट स्वराचा उच्चार) मुळे चुकली. ‘oconee bells’ या वनस्पतीच्या नावाचे स्पेलिंग तिने ‘aconae bells’ असे केल्याने तिची संधी हुकली.
- झ्वे स्पेसटाईम: २०२१ ची विजेती झैला अवंत-गार्डेचा हा १४ वर्षीय भाऊ ‘vaesite’ (एक प्रकारचे खनिज) या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याने बाहेर पडला. मात्र, त्याने चेहऱ्यावर हसू ठेवत इतर सहकाऱ्यांना हस्तांदोलन करत मंचाचा निरोप घेतला.
६ वीच्या लोगन बेलिने जिंकली प्रेक्षकांची मने
विजेतेपद जरी श्रेयने पटकावले असले, तरी हुस्टनच्या ६ व्या इयत्तेत शिकणाऱ्या लोगन बेली या चिमुरड्याने डी.ए.आर. कॉन्स्टिट्युशन हॉलमधील हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक अचूक स्पेलिंगनंतर डोक्याला हात मारणे, “नो वे!” म्हणून ओरडणे आणि सहकाऱ्यांना ‘हाय-फाय’ देणे या त्याच्या उत्साही स्वभावामुळे तो प्रेक्षकांचा प्रचंड आवडता बनला.
परंतु, ‘Quincke tube’ (फुंकर मारल्यावर बाटलीसारखा आवाज करणारी काचेची नळी) या शब्दाने लोगनला चकवले. हा शब्द ऐकताच आपण बाद होणार हे ओळखून तो मंचावरच “नो! नो! नो!” म्हणून रडू लागला. मुख्य परीक्षक मेरी ब्रूक्स यांनी घंटा वाजवून तो बाद झाल्याचे जाहीर करताच संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.
स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणारे पॉल लोफ्लर भावूक होऊन म्हणाले, “लोगन बाद झाल्यावर घरी टीव्ही पाहणारे प्रेक्षकही रडले असतील. इतक्या लहान मुलाने संपूर्ण सभागृहाला भावूक करण्याची ही घटना मी अनेक वर्षांत पाहिलेली नाही.”
बाद होणाऱ्या मुलांना आधार देणाऱ्या परीक्षक ‘मेरी ब्रूक्स’
या स्पर्धेत सर्वात कठीण काम असते ते मुख्य परीक्षक मेरी ब्रूक्स यांचे. स्पर्धकाचे स्पेलिंग चुकल्याचे सांगणारी ‘घंटा’ वाजवण्याचे कटू काम त्यांना करावे लागते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच मेरी म्हणाल्या होत्या, “मला आज घंटा वाजवायची नाहीये, कारण अंतिम फेरीतील नऊही मुले मला अत्यंत प्रिय आहेत.” ही घंटा जरी स्पर्धकांचे स्वप्न तोडणारी असली, तरी मेरी ब्रूक्स प्रत्येक बाद होणाऱ्या मुलाला प्रेमाने जवळ घेऊन धीर देतात. तिसऱ्या फेरीत बाद झालेल्या अविष्काला धीर देताना त्या म्हणाल्या, “तुझी गेल्या दोन वर्षांची कामगिरी खरोखरच अद्भूत होती.” तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ६ वीच्या सर्व धरवणे याला धीर देताना त्या म्हणाल्या, “तुझा प्रवास इथे संपलेला नाही, तू पुन्हा नक्की परत येशील याची मला खात्री आहे.”
