SD Pay App Fraud Vadodara 1200 Crore Scam: जास्त परतावा मिळवण्याच्या आमिषाने ॲपमध्ये गुंतवणूक केलेल्या लाखो लोकांची शेकडो कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमध्ये ‘एसडी पे’ (SD Pay) या डिजिटल वॉलेट ॲपच्या माध्यमातून झालेला तब्बल १२०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या ॲपमध्ये गुंतवणूक केलेल्या एका शिक्षिकेने तर आपला फ्लॅट विकून मिळालेले ९.५ लाख रुपये गुंतवले होते. ॲप बंद झाल्याने तिच्यासह लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत.
या प्रकरणात वडोदरामधील एका ४८ वर्षीय शिक्षिकेची ९.५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ‘सिंगल मदर’ असलेल्या या शिक्षिकेने २०२५ मध्ये आपला १ बीएचके फ्लॅट विकून ९.५ लाख रुपये ‘एसडी पे’ नावाच्या डिजिटल वॉलेट ॲपमध्ये गुंतवले होते. डिजिटल वॉलेटमधील संबंधित शिक्षिकेची शिल्लक रककम २०२६ च्या मध्यापर्यंत ५० लाख रुपयांवर पोहोचली होती, परंतु २०२६ च्या मध्यास हे ॲप बंद झाल्यामुळे त्या आपली रक्कम काढू शकल्या नाहीत.
या पीडित शिक्षिकेची जुलै २०२५ मध्ये अशा एका व्यक्तीशी भेट झाली, जो कथितरीत्या ‘एसडी पे’चे कामकाज पाहत होता. त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला सांगितले, “मी सुरुवातीला यात गुंतवणूक करण्यास नकार दिला होता, परंतु त्यांनी मला ‘एस्क्रो वॉलेट’ आणि काही कागदपत्रे दाखवली. त्यानंतरही मी नकार दिला, तेव्हा त्यांनी मला स्वाक्षरी केलेला एक कोरा चेक दिला आणि सांगितले की, जर माझा त्यांच्यावर विश्वास नसेल, तर मी स्वतः हवी ती रक्कम भरून तो चेक कधीही वटवू शकते. अशा प्रकारे त्यांनी माझा विश्वास संपादन केला.”
शिक्षिकेच्या नातेवाईकांनाही फटका
या शिक्षिकेने पुढे सांगितले की, ‘एसडी पे’मधील आपल्या गुंतवणुकीवर आपण समाधानी आहोत अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर टाकल्यानंतर तिच्या जवळच्या वर्तुळातील ३१ इतर लोकही यात गुंतवणूक केली. यामध्ये तिच्या कुटुंबातील एक विधवा बहीण, सत्तरहून अधिक वयाची आई आणि भाऊ यांच्यासह ११ सदस्यांचा समावेश आहे. ज्यांनी एकूण ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली. तसेच तिच्या २० सहकाऱ्यांनी १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
१५ लाख डाउनलोड्स!
या घोटाळ्यातील मुख्य आरोपी धवल पटेल याने २०२४ मध्ये ‘एसडी पे’ (ज्याला ‘अपना पे’ असेही म्हटले जात असे) हे मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले होते. या ॲपद्वारे बिल भरणे आणि मोबाइल रिचार्ज करणे अधिक सोपे होईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या मोठ्या आर्थिक परताव्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि ‘रेफरल्स’च्या माध्यमातून १५ लाख लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केले.
१२०० कोटींचा घोटाळा
एका तपास अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, सप्टेंबर महिन्यात अमरेली जिल्ह्यात पहिल्यांदा उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती १२०० कोटी रुपयांच्या वर गेली असून, आतापर्यंत १८ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत आणि डझनभर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पती-पत्नीने गमावले ६० लाख रुपये
पोलिसांना सुरेंद्रनगरमधील एक अशी पीडित व्यक्ती सापडली, ज्याने या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी स्वतःच्या नावावर २० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले, पत्नीच्या नावावर आणखी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यानंतर २० लाख रुपयांचे गोल्ड लोन घेतले. या सर्व रकमेची त्याने ‘एसडी पे’ मध्ये गुंतवणूक केली, या आशेने की त्यातून मिळणाऱ्या परताव्याद्वारे तो स्वतःचे घर बांधू शकेल. आता तो आपली मूळ गुंतवलेली रक्कमही परत मिळवू शकत नाही.
महाराष्ट्र कनेक्शन
“या गुन्ह्याशी संबंधित सुमारे ९५ मुख्य एजंट्सची ओळख पटली आहे. हे एजंट्स गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश आणि चंदीगडसह विविध राज्यांत एजंट किंवा मार्केटिंग प्रमुख म्हणून काम करत होते”, असे पोलिसांनी सांगितल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
