दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचा आता येथून दक्षिणेकडील शेकडो किलोमीटर अंतरावरील समुद्रात शोध घेण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी हे विमान कोसळले असावे, असा प्रारंभीचा अंदाज होता. हिंदी महासागरात अथक शोधाचे प्रयत्न करूनही या विमानाचा काहीही ठावठिकाणा न लागल्यामुळे आता पुन्हा एकदा शोधाची दिशा बदलण्याचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
सध्या अजूनही हिंदी महासागरात या विमानाचा शोध घेतला जात असला तरी आता पर्थच्या पश्चिमेकडे सुमारे १,८०० किलोमीटर अंतरावर या शोधाचे ठिकाण केंद्रित करण्यात येईल. याआधी त्या ठिकाणी हे विमान कोसळले असण्याचा अंदाज मार्च महिन्याच्या अखेरीस फेटाळण्यात आला होता.
मार्च महिन्याच्या आठ तारखेस झालेल्या दुर्घटनेचा अद्याप कोणत्याही प्रकारचा ठावठिकाणा लागला नसून त्यामध्ये पाच भारतीयांसह २३९ जण बेपत्ता झाले आहेत. हे सर्वजण आता जिवंत मिळण्याची शक्यता फारच धूसर असून नंतर काही आठवडय़ांतच मलेशिया सरकारने सर्व प्रवासी मरण पावल्याचे अधिकृतरीत्या घोषित केले होते.