पुणे : प्रतिकूल स्थितीमुळे र्नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकले आहेत. त्यामुळे हे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाच्या काही सरी बरसल्या. मात्र, हा मोसमी पूर्व पाऊसच आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणतायेणार नसल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील. बुधवारी (२५ मे) विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (२६ मे) विदर्भातील गोंदिया जिल्हा सोडून उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी (२७ मे) विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तरपूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रिय स्थिती आहे. यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.